पाकिस्तानचा सात गडी राखून विजय, बाबर-रिजवानची जबरदस्त खेळी - Rayat Samachar

पाकिस्तानचा सात गडी राखून विजय, बाबर-रिजवानची जबरदस्त खेळी

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

 

पाकिस्तानचा सात गडी राखून विजय, बाबर-रिजवानची जबरदस्त खेळ

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) १२.६.२४

पाकिस्तानने कॅनडाविरुद्ध २०२४ टी२० विश्वचषकातील २२ वा सामना सात गडी राखून जिंकून सुपर-८ च्या शर्यतीत स्वतःला कायम ठेवले आहे. या विजयासह बाबर आझमच्या संघाच्या निव्वळ धावगतीमध्ये सुधारणा झाली आहे. आता त्याचा नेट रन रेट +०.१९१ झाला आहे. यासोबतच संघ दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना आयर्लंडविरुद्ध खेळायचा आहे. हा सामना १६ जून रोजी लॉडरहिल येथे खेळला जाणार आहे ज्यामध्ये पाकिस्तानला कोणत्याही किंमतीत मोठ्या फरकाने जिंकावे लागेल. गुणतालिकेत भारत चार गुणांसह अव्वल स्थानावर कायम आहे. त्याचवेळी अमेरिका चार गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. १२ जून रोजी दोन्ही संघांमध्ये रात्री ८ वाजता सामना होणार आहे.

न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ॲरॉन जोन्सच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर कॅनडाने २० षटकांत ७ गडी गमावून १०६ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानच्या नाबाद ५३ धावांच्या खेळीच्या जोरावर १७.३ षटकांत तीन गडी गमावून १०७ धावा केल्या. सध्याच्या स्पर्धेतील हा पाकिस्तानचा पहिला विजय आहे.

१०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानला पहिला धक्का २० धावांवर बसला. पाचव्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर सईम अयूबला हेलाइगरने मोव्वाकरवी झेलबाद केले. त्याला केवळ ६ धावा करता आल्या. न्यूयॉर्कच्या संथ खेळपट्टीवर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोघांनी ६२ चेंडूंचा सामना करत ६३ धावांची भागीदारी केली. हेलाइगरने १५ व्या षटकात बाबरला आपला बळी बनवले. तो ३३ चेंडूत ३३ धावा करून तंबूमध्ये परतला. या सामन्यात फखर जमान ४ धावा करून नाबाद राहिला तर उस्मान खानने २ धावा केल्यानंतर नाबाद राहिला. तर मोहम्मद रिझवानने ५३ धावांची मॅचविनिंग इनिंग खेळली. यादरम्यान त्याने २ चौकार आणि एक षटकार लगावला. कॅनडाकडून डिलन हेलाइगरने दोन आणि जेरेमी गॉर्डनने एक विकेट घेतली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला कॅनडाचा संघ पाकिस्तानी गोलंदाजांसमोर झुंजताना दिसला. या सामन्यात ॲरॉन जॉन्सनशिवाय कॅनडाचा एकही फलंदाज खेळला नाही. त्याने ४४ चेंडूत ५२ धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ४ चौकार आणि तेवढेच षटकार आले. या सामन्यात नवनीतने ४, परगटने २, निकोलसने १, श्रेयसने २, रविंदर पालने शून्य आणि साद बिन जफरने १० धावा केल्या. तर, कलीम सना १३ आणि डिलन हेलाइगर ९ धावा करून नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद आमिर आणि हरिस रौफने प्रत्येकी २ बळी घेतले. याशिवाय शाहीन शाह आफ्रिदी आणि नसीम शाह यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

मोहम्मद आमिरला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Share This Article
Leave a comment