अहमदनगर (प्रतिनिधी) १२.६.२४
येथील वर्धापनदिनाच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद्चंद्र वापर यांनी केलेले भाषण वाचा.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जयंतराव पाटील, तुम्हा सर्वांचे आशीर्वादाने देशाच्या लोकसभेमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ज्या आठ सहकाऱ्यांना आपण दिली ते आठही विजयी खासदार, सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोंच्या संख्येने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आणि विशेषतः अहमदनगर आणि परिसरातील आपण सगळे बंधू-भगिनी..!
आजचा दिवस हा पक्षाचा वर्धापन दिवस आहे. सुदैवाने हा आनंद साजरा करण्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेने यंदा झालेल्या निवडणुकीमध्ये दहा पैकी आठ जागा निवडून देऊन या वर्धापन दिनाला एक अतिशय उत्तम प्रकारची साथ दिली. २५ वर्षांपूर्वी या पक्षाची आपण स्थापना केली, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जायचं हे ठरवलं. पण भाग्य असं, पक्ष स्थापन केला आणि ३ महिन्यांच्या आत महाराष्ट्राच्या सत्तेच्या राजकारणामध्ये प्रभावीपणाने काम करण्याची संधी महाराष्ट्रातल्या जनतेने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिली. तेव्हापासून जवळपास १७ ते १८ वर्ष सतत महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची संधी दिली. एवढेच नव्हे, महाराष्ट्राच्या बरोबर केंद्र सरकारमध्ये सुद्धा काम करण्याची संधी दिली आणि केंद्राचं जे सरकार होतं, त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा वाटा सुद्धा अत्यंत मोलाचा होता. म्हणून हा दिवस रौप्य महोत्सवाचा साजरा करायचा असेल, तर अहिल्यानगरची निवड या ठिकाणी केली. याचा इतिहास जयंतरावांनी आपल्या भाषणात सांगितलं. अहिल्यादेवी होळकर यांचे कर्तृत्व, त्यांची दृष्टी, त्यांचं प्रशासन कौशल्य हा तुम्हाला अभिमान वाटणारा विषय आहे. पण अहिल्याबाईंची ही जी बाजू आहे, तशी या अहिल्यानगर किंवा जुना अहमदनगर याची एक दुसरी बाजू आहे. ती दुसरी बाजू देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची आहे. याच अहमदनगरला, अहिल्यानगरला १९४२ साली ८ ऑगस्टला एक महत्त्वाचा कार्यक्रम गांधीजींच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये झाला, ऑगस्ट क्रांती मैदानावर. काँग्रेस पक्षाची कार्यकारिणी होती आणि महात्मा गांधीजी यांनी छोडो भारत म्हणून घोषणा केली. महात्मा गांधींना इंग्रजांनी अटक केली आणि पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये त्यांना नेऊन ठेवलं. पण काँग्रेसची कार्यकारिणी त्या ठिकाणी होती, त्याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू होते, मौलाना आझाद होते, राजेंद्र प्रसाद होते, अनेक महत्त्वाचे नेते होते. इंग्रजांनी या कार्यकारिणीच्या सदस्यांना, या नेत्यांना अटक केली आणि अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये त्या ठिकाणी आणून ठेवलं. या किल्ल्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून. पंडितजींनी त्यांचं या किल्ल्यामध्ये वास्तव असताना डिस्कवरी ऑफ इंडिया नावाचा एक ग्रंथ या देशाचा एक सबंध इतिहास जो जगमान्य झाला, त्याचं लिखाण याच अहमदनगर मधल्या या किल्ल्यामध्ये त्या काळामध्ये हे झालेलं होतं. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथले अनेक लोक सहभागी झाले आणि त्यांची मालिका आपण करायची ठरवली तर हजारो लोकांची नाव आपल्याला घ्यावी लागतील. पण २ नावं हे मला विसरून चालणार नाही. एक अच्युतराव पटवर्धन आणि रावसाहेब पटवर्धन काँग्रेस कार्यकारणीच्या गांधीजींच्या बरोबर होते सहकारी हे याच अहमदनगर मधली किंवा अहिल्यानगर मधून पुढे आले आणि देशाचे स्वातंत्र्यांमध्ये त्यांनी फार मोठी कामगिरी केली.
स्वातंत्र्याच्या आधीचे प्रश्न हे वेगळे होते आता वेगळे प्रश्न आहेत. आता प्रश्न असे आहेत आज काय बघतोय आपण? प्रधानमंत्री यांनी, मोदींनी शपथ घेतली. पण शपथ घेण्यापूर्वी त्यांना या देशाचा मॅन्डेट होता? देशाच्या जनतेने त्यांना सहमती दाखवली होती? त्यांचं बहुमत नव्हतं. तेलगु देसम आणि बिहारच्या मुख्यमंत्र्यांची मदत घेतली, त्यामुळे आज त्यांचं त्या ठिकाणी राज्य झालेलं आहे. आजचे जे सरकार आहे हे वेगळं सरकार आहे. तुम्हाला आठवत असेल, या निवडणुकीच्या काळामध्ये मोदी जाईल त्या ठिकाणी भारताचे सरकार कधी म्हणत नव्हते, मोदी सरकार म्हणत होते, मोदी गॅरंटी म्हणत होते. आज ती मोदी गॅरंटी राहिलेली नाही. आज ते मोदी सरकार राहिलेलं नाही. आज तुम्ही लोकांनी तुमच्या लोकशाहीच्या मताच्या अधिकाऱ्याच्या जोरावर मोदींना सांगावं लागलं, की हे मोदी सरकार नाही तर हे एनडीए गव्हर्नमेंट आहे भारत सरकार आहे, आज त्यांनी वेगळी भूमिका घेतली आणि ते केवळ तुमच्या सर्वांच्या मदतीने. ठीक आहे त्यांनी काय केलं, आपण पुढे जायचं आहे. पुढे जात असताना एक नवीन कर्तृत्ववान फळी उभी करायची, जनतेचं संरक्षण मिळवायचं आणि महाराष्ट्रापुरतं सांगायचं झालं तर महाराष्ट्रच नव्हे तर महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तिन्ही राज्यांमध्ये तीन महिन्यांनी निवडणुका आहेत, त्या निवडणुकीमध्ये आपल्याला कष्ट करायचे आहेत आणि त्या ठिकाणी सरकार आणायचं आहे आणि ते सरकार आणून लोकांना एक प्रकारचा विश्वास द्यायचा आहे.
मोदी साहेबांचा प्रचार हा मी काही सांगायची आवश्यकता नाही. प्रधानमंत्री पदावर बसलेली व्यक्ती निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने प्रयत्न करते? प्रधानमंत्री हा कुठल्या एखाद्या पक्षाचा नसतो, तो देशाचा असतो. अपेक्षा अशी असते की देशाच्या प्रधानमंत्री यांनी देशातील सर्व जाती, धर्म, भाषा या घटकांचा विचार केला पाहिजे, पण हे करायला मोदी विसरले. विसरले असं मला वाटत नाही, त्यांनी ते मुद्दाम केलं, कारण त्यांची विचारधारा ती होती. काय त्यांनी सांगितलं? अल्पसंख्यांक हा देशाचा एक महत्त्वाचा वर्ग आहे. तो मुस्लिम असेल, तो ख्रिश्चन असेल, तो शीख असेल तो पारशी असेल, तो कुठल्याही जातीचा पातीचा असेल, आज या लोकांसाठी एक प्रकारचा विश्वास देण्याची कामगिरी ही राज्यकर्त्यांना करावी लागते. पण मोदी हे करण्यासाठी कमी पडले, त्यांनी एके ठिकाणी भाषण केलं. काय त्यांनी भाषण केलं? एके ठिकाणी भाषण करत असताना त्यांनी सांगितलं, की या देशामध्ये ज्यांच्या घरामध्ये मुलं जास्त जन्माला येतात, असा एक वर्ग आहे. याचा अर्थ, त्यांना या देशातल्या मुस्लिम समाजाबद्दल बोलायचं होतं, हे स्पष्ट होतं. ते म्हटले, की उद्याच्याला यांच्या हातात सत्ता गेली तर तुमच्या घराच्या भगिनींचं मंगळसूत्र ते काढून घेतील, कधी घडलंय असं या देशात? त्यांनी हे सांगितलं, एका शेतकऱ्यांच्या भेटीमध्ये, ते म्हटले यांच्या हातात सत्ता आली, तुमच्या घरी दोन म्हशी असतील त्यातील एक म्हैस ते काढून नेतील. काय बोलायचं? प्रधानमंत्री यांनी हे बोलायचं? प्रधानमंत्र्यांनी या प्रकारची चर्चा करायची? पण त्याचं तारतम्य बाळगण्याच्या संबंधित ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादा मोदी साहेबांनी पाळल्या नाहीत, ही गोष्ट विसरून चालणार नाही.
राजकीय पक्ष आम्ही एकमेकांवर टीका करतो पण टीका करताना सुद्धा काही मर्यादा ठेवतो. काय बोलले मोदी? माझ्या बाबतीत बोलले की भटकती आत्मा..! माझ्याबद्दल त्यांनी उल्लेख केला हा भटकता आत्मा आहे, एका दृष्टीने बरं झालं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आत्मा हा कायम राहतो. हा कायम राहणार आत्मा तुम्हाला सोडणार नाही, कारण तो कायम त्या ठिकाणी राहणार आहे. त्यांनी उल्लेख केला शिवसेनेच्या संदर्भात, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची निर्मिती केली, त्यांनी राज्य केलं. मराठी माणसाचा आत्मविश्वास दिला आणि त्याचा उल्लेख करत असताना ही नकली बापाची संघटना? हे बोलणं काही शोभतं? एखाद्या संस्थेला, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या व्यक्तीसमूहाला त्यांची पार्श्वभूमी नकली आहे, हे प्रधानमंत्र्यांनी बोलायचं? याचा अर्थ हा आहे, की त्यांना तारतम्य राहिलेलं नाही. सत्ता हातात येते, त्या सत्तेचं समर्थन करणं, सत्ता जर मिळवण्याची शक्यता नसली तर माणूस बेफाम आणि अस्वस्थ कसा होतो, त्या प्रकारची स्थिती त्यांनी या ठिकाणी दाखवली. ठीक आहे, त्यांच्याकडून झालं आपण ते विसरू या, आपण नव्या विचारांनी जाऊया, आपण हा देश कसा प्रगतीच्या रस्त्यावर न्यायचा त्याचा विचार आपण करूया आणि ते करण्यासाठी अनेक गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. संघटना मजबूत करावी लागेल, समाजातील जो दलित वर्ग आहे, अल्पसंख्यांक वर्ग आहे, महिलांचा वर्ग आहे, छोटे मोठे घटक आहेत त्यांच्या हिताची जपणूक हे करण्यासंबंधीची खबरदारी आपल्या सर्वांना घ्यायची आहे. हे करणारा पक्ष कोणता? तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, हा इतिहास निर्माण करायचा आहे.
निवडणुका येतील, त्या निवडणुकीला आपण सामोरे जाऊ, लोकांना बरोबर घेऊ, त्यांना आत्मविश्वास देऊ आणि मनापासून त्यांची सेवा करण्यासंबंधीचं वचन त्यांना देऊ आणि त्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. सुदैवाने या देशातील लोक मोदी सरकारने प्रश्न जे काढले, त्या प्रश्नांना फारसे लोक महत्त्व देत नाही. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली, तर लोकांच्यात चर्चा अशी होती, की राम मंदिराचा प्रश्न हा महत्त्वाचा होईल. आज काय दिसतंय? मंदिर बांधलं, आनंद आहे उद्या मी आयोध्येला गेलो, तर मंदिरात जाईन. त्या ठिकाणी रामाचा सन्मान ठेवीन. पण राजकारणासाठी मी कधी वापर करणार नाही. ते चुकीचं काम राजकारणासाठी मोदींनी केलं, त्याची नोंद अयोध्येतील जनतेने घेतली. राम मंदिराचे स्मरण करून त्या ठिकाणी मोदींचा उमेदवार जो होता, त्याचा १००% पराभव अयोध्येतील जनतेने केला हा इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. त्यामुळे आता त्याचा फारसा विचार करायचा नाही.
तुम्ही चांगले लोक निवडून दिले, इथे आठ जणांचा परिचय तुम्हाला करून दिला यातील प्रत्येक व्यक्ती ही लोकांच्या सुखदुःखाशी संबंध ठेवणार आहे. मी तुम्हाला खात्री देतो या पक्षाचा नेता म्हणून की आमचे सगळे खासदार दिल्लीमध्ये जातील, तुमच्या प्रश्नांसाठी सतत जागरूक राहतील. नवीन काही लोक आहेत, त्यांना जे काही मार्गदर्शन हवे असेल, तर त्या ठिकाणी मी सुद्धा काही दिवस आहे. मलाही आता यंदाच्या वर्षी पार्लमेंट आणि विधानसभा इथे जाऊन ५६ वर्ष पूर्ण होत आहेत, आणखी किती वर्ष राहायचं? ५६ वर्ष एकाही दिवसाची सुट्टी नाही, असं काम महाराष्ट्राच्या जनतेने माझ्यावर सोपवलं. त्यामुळे मला जे काही या संबंधित ज्ञान असेल, ते या आठही जणांच्या मागे कायमच राहील आणि त्यांच्यामार्फत आज त्या ठिकाणी काम करून घेतले जाईल. सुदैवाने सुप्रिया आणि कोल्हे साहेब हे दोन्ही अनुभवी सदस्य आहेत. सुप्रियाची चौथी टर्म आहे, कोल्हे साहेबांची दुसरी टर्म आहे आणि संसदपटू म्हणून संसद सन्मान हा या दोघांनाही मिळालेला आहे. त्या दोघांचीही मदत या नवीन सदस्यांना होईल आणि त्यांच्यामार्फत तुमच्या जिल्ह्याचे, तुमच्या मतदारसंघाचे, तुमच्या राज्याचे जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, ते प्रभावीपणाने आज त्या ठिकाणी मांडले जातील. हे आठही लोक माझ्या दृष्टीने छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ होतं, तसं हे महाराष्ट्राच्या जनतेचे अष्टप्रधान महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करतील, याची खात्री मी देतो.
आजचा हा सबंध सोहळा आयोजित करण्यासाठी नगर जिल्ह्याची राष्ट्रवादी, त्याचे सगळे नेते आणि विशेषतः तुम्ही मोठ्या मतांनी ज्यांना निवडून दिलं ते आपले खासदार निलेशजी या सगळ्यांना मी त्याचे श्रेय देतो. खरं सांगायचं म्हणजे निलेश लोकसभेत आल्यानंतर मला काळजी एकाच गोष्टीची आहे की जे आमचे सभासद आहेत, ते सगळे जुने सभासद आहेत. त्यांना पार्लमेंट मध्ये सगळेजण नक्कीच विचारतील की हा कोण या ठिकाणी आणला? हा खासदार आणि तिथे भाषण करायला त्यांना मी सांगितलं तिथे मराठीत सुद्धा बोलता येतं. निवडणुकीच्या काळामध्ये कुणीतरी म्हणत होतं, की इंग्रजीत का नाही बोलला? इंग्रजीत बोलावं लागतं असं नाही. तुम्ही हिंदीत बोलू शकता, तुम्ही मातृभाषेत बोलू शकता, मराठीमध्ये बोलू शकता आणि एकदा का माईक हातात आला, तर निलेशजी मराठीमध्ये काय बोलतील याचा भरोसा नाही. त्यांना मोठ्या मतांनी तुम्ही निवडून दिलं. भगरे गुरुजी यांच्यासारखा आदिवासी समाजातला एक शिक्षक अत्यंत साधा, आज जनतेने मोठ्या मतांनी निवडून दिला. मी नाशिक जिल्ह्यातल्या जनतेचे व दिंडोरी भागातल्या जनतेचे मी अंतःकरणापासून आभार मानतो आणि आमचे हे आठही खासदार तुम्हा सर्वांची सेवा चांगल्या दृष्टीने करतील, अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. यांना खासदारकी देण्यासाठी जनतेचा पाठिंबा, तसेच राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रात्रीचा दिवस करून जयंतराव पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मेहनत त्यांनी केली, या सगळ्याची नोंद आम्ही कायम घेऊ, एवढीच खात्री या ठिकाणी देतो आणि माझे दोन शब्द संपवतो..!
जय हिंद, जय महाराष्ट्र..!