अहमदनगर |२० डिसेंबर | दिपक शिरसाठ
(Ahilyanagar News) अहमदनगर जिल्हा हा कलावंतांचा जिल्हा आहे. जिल्ह्यातील अनेक नाट्यस्पर्धा दुर्दैवाने बंद झाल्या. आता कलाकारांना राज्य नाट्यस्पर्धा व अहमदनगर करंडक एवढेच व्यासपीठ उपलब्ध आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या कलाकारांची ख्याती जगभर व्हावी, असे प्रतिपादन अहमदनगर होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील पवार यांनी केले. कॉलेजच्या वतीने राज्य नाट्य स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या ‘मर्म’ नाटकातील कलावंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य पवार बोलत होते.
यावेळी डॉ.विद्या देशमुख, जिल्हा मराठा पतसंस्था संचालिका डॉ.कल्पना ठुबे, पं.स. माजी उपसभापती डॉ.दिलीप पवार, डॉ.ज्योती तांबे, डॉ.पूजा भंडारी, संतोष हारदे, अतुल गेरंगे, राधिका जाधव, नवनाथ आठरे आदी मान्यवर उपस्थित होते.
६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेत नगर केंद्रातून रंगमुद्रा युवा प्रतिष्ठान (वडगाव गुप्ता) या संस्थेच्या ‘मर्म’ या नाटकाने बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकाविला. या नाटकाचे लेखन प्रा.रवींद्र काळे यांनी केले. नाटकाचे दिग्दर्शक रियाज पठाण व महेश काळे यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
यावेळी डॉ. पवार म्हणाले, ग्रामीण भागातील कलाकार पुढे जात आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांना प्रोत्साहन देणं हे आपलं कर्तव्य आहे. एक छोटासा सत्कार कलाकारांना उमेद देतो त्यामुळे त्यांची पुढची वाटचाल नक्कीच सोपे होते. अंतिम फेरीसाठी ‘मर्म’ टीमच्या सर्व कलाकारांना त्यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हारदे यांनी केले तर डॉक्टर दिलीप पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी