अहिल्यानगर | २३.११ | पंकज गुंदेचा
Inspirational Journey: प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत प्रिंटिंग प्रेसमध्ये कामगार म्हणून सुरुवात करून राज्यकर अधिकारीपदापर्यंत मजल मारणारे अर्जुन दशरथ दारकुंडे यांचा राज्यकर अधिकारीपदी पदोन्नती झाल्याबद्दल सोमवार, ता. २३ नोव्हेंबर रोजी निंबळक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सपत्नीक सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार होते.
यावेळी माजी उपसरपंच घनश्याम म्हस्के म्हणाले की, अर्जुन दारकुंडे यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. आगडगावसारख्या डोंगराळ भागातून प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत पुण्यात जाऊन शिक्षण पूर्ण केले. शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केले. ज्या मातीत आपण घडलो, त्याच मातीत आपला सन्मान होणे ही आयुष्यातील महत्त्वाची बाब आहे. रोहिणी दारकुंडे यांनीही याच शाळेत शिक्षण घेतले असून शाळेच्या विविध उपक्रमांत योगदान दिले आहे. त्यामुळे दोघांचा या शाळेत होणारा सन्मान हा आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. प्रत्येकाने आपल्या क्षेत्रात प्राविण्य मिळवावे. केवळ शासकीय नोकरीच नव्हे, तर शेती आणि व्यवसायातही कर्तृत्व सिद्ध करता येते, असे त्यांनी सांगितले.
मुख्याध्यापक एम. बी. कोल्हे म्हणाले की, अत्यंत सामान्य कुटुंबात जन्म घेऊन प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत अर्जुन दारकुंडे यांनी असामान्य यश मिळवले आहे. त्यांची पत्नी रोहिणी या शाळेच्या माजी विद्यार्थिनी असल्याने त्यांच्या कुटुंबाचा शाळेशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. विद्यार्थ्यांना अशा कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनप्रवासातून प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या मनातही मोठे अधिकारी होण्याची जिद्द निर्माण व्हावी, या उद्देशाने शाळेत या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. अर्जुन यांनी भविष्यात आणखी मोठ्या पदावर पोहोचावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. दिलीप पवार म्हणाले, विद्यार्थ्यांनी शाळेत शिकताना आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संस्कार महत्त्वाचे आहेत. शाळेच्या प्रांगणात लागलेली शिस्त आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी उपयोगी पडते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कुटुंबासोबत शिक्षकांचेही योगदान महत्त्वाचे असते. अर्जुन दारकुंडे यांच्या यशामागे त्यांच्या कुटुंबाची साथ आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना अर्जुन दारकुंडे यांच्या पत्नी रोहिणी म्हणाल्या की, त्यांनी याच शाळेत दोन वर्षे रेमेडियल एज्युकेटर म्हणून काम केले असून त्यावेळी शाळेतील शिक्षकांनी त्यांना सहकार्य केले. अर्जुन यांची सुरुवातीची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. शिक्षण घेताना त्यांनी प्रिंटिंग प्रेसमध्ये काम केले. बी.एस्सी.चे शिक्षण घेत असताना तहसील कार्यालयात अर्धवेळ नोकरी केली. त्यानंतर पुण्यात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतल्यानंतर महाविद्यालयाच्या मेसमध्ये वेटर म्हणून काम करून शिक्षणाचा खर्च भागवला.
२०१७ मध्ये त्यांची जीएसटी विभागात टॅक्स असिस्टंट म्हणून नियुक्ती झाली. २०१८ मध्ये आमचे लग्न झाले. त्यानंतरही त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला. सकाळी लवकर उठून अभ्यास करणे आणि त्यानंतर कार्यालयात जाणे, असा त्यांचा दिनक्रम होता. अनेक वर्षे त्यांनी अभ्यासासाठी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या जिद्द आणि चिकाटीमुळेच आज ते या पदापर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्या या प्रवासात कुटुंब म्हणून सहकार्य करता आले, याचे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. शाळेने आयोजित केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचे आभार मानले.
यावेळी सुनिता रणदिवे, दत्तात्रय दिवटे, आणि समीर पटेल यांनीही मनोगत व्यक्त करून अर्जुन दारकुंडे यांच्या यशाचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला ग्रामसेवक श्री. रासकर, ग्रामपंचायत प्रशासक आंबेडकर, बी. डी. कोतकर, महेश म्हस्के, दत्ता धावडे यांसह विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ झावरे व सूत्रसंचालन सुरेश कार्ले यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


