अहिल्यानगर | १०.१० | रयत समाचार
दिंडी | Way of Life : सध्या वाचकांपेक्षा रिल्स व शॉर्ट व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. पुढील पिढीला दिशा देण्यासाठी प्रभावी आणि चांगल्या व्हिडिओंसारख्या माध्यमांतून समाजात सकारात्मक बदल घडवता येऊ शकतात. सोशल मीडियावरील चुकीच्या गोष्टी थांबविण्यासाठी हस्तक्षेप करून समाजाला चांगल्या गोष्टी देणे आणि समाजपरिवर्तनासाठी माध्यम म्हणून काम करणे आवश्यक आहे. पुरोगामी असलेल्या वारकरी संप्रदायाला हायजॅक करण्याचे काम प्रतिगामी शक्ती करत आहेत. वारकरी संप्रदायात घुसून त्याचा कब्जा घेण्याचे काम सुरू असून, त्याविरोधात प्रतिक्रांती करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे यांनी केले.

‘दिंडी : वे ऑफ लाइफ’ या निरीक्षणात्मक लघुपटाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याबद्दल अहिल्यानगर शहरातील सकल भारतीय समाजाच्या वतीने लघुपटाचे दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे व उज्वला वाकळे यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. शहरातील रहेमत सुलतान सभागृहात या लघुपटाचे स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात अभिजीत कांबळे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सिने अभ्यासक प्रा. संदीप गिऱ्हे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना ज्येष्ठ पत्रकार अभिजीत कांबळे म्हणाले की, 2014 पासून वातावरण बदलले. अहिल्यानगरमध्ये चळवळीतील कार्यकर्ते 2014 पूर्वी आणि त्यानंतरही प्रस्थापितांविरोधात चळवळ चालवतात, हे विशेष आहे. आपले म्हणणे मांडण्यासाठी नवीन फॉर्म निवडताना व्हिडिओ हे सर्वोत्तम माध्यम ठरत आहे. सामाजिक व परिवर्तनवादी विषय लिहिण्यापेक्षा व्हिडिओचा परिणाम अधिक होतो. वाचन कमी होत असल्याची खंत व्यक्त करत त्यांनी सांगितले की, नवीन पिढीदेखील सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ पाहणे पसंत करते. तरुण वर्गापर्यंत पोहोचण्यासाठी हे उत्तम माध्यम आहे. तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पाहुणे सिने अभ्यासक प्रा. संदीप गिऱ्हे यांनी चित्रपटसृष्टीच्या ऐतिहासिक प्रवासाचा आढावा घेतला. 1900 पूर्वीच्या फिल्मी दुनियेपासून त्यांनी आपल्या विवेचनाला सुरुवात केली. नाटकाची सुरुवात, नाटकाचे चित्रीकरण करून ते थिएटरमध्ये दाखविणे, विविध ठिकाणी चित्रीकरण करणे, कथा लेखन आणि कथेनंतर स्क्रिप्टचा विकास, अशा टप्प्यांतून फिल्म ते सिनेमा हा प्रवास कसा घडत गेला, हे त्यांनी सांगितले.
1913 नंतर सिनेमात कसे बदल झाले, पौराणिक चित्रपटांनंतर 1932 पासून चित्रपटांमध्ये आवाज कसा आला, याची माहिती त्यांनी दिली. भारत ही जगातील एकमेव अशी सिनेसृष्टी आहे, जिथे चित्रपटांमध्ये गाणी असतात, असे त्यांनी नमूद केले. 1932 ते 1948 या कालखंडातील चित्रपटसृष्टीतील चढ-उतार आणि वास्तव मांडणारे चित्रपट पुढे कसे आले, यावरही त्यांनी प्रकाश टाकला. चित्रपट ही चित्रांची भाषा असून, सिनेमात बोलले काय जाते यापेक्षा दाखवले काय जाते, याला अधिक महत्त्व आहे, असे प्रा. गिऱ्हे यांनी स्पष्ट केले. सध्या चित्रपटांमध्ये राजकारणाचा प्रवेश होऊन प्रचारकी भूमिका मांडणारे आणि प्रोपगंडा निर्माण करणारे चित्रपट तयार होण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, ही शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.

करताना सिने अभ्यासक प्रा. संदीप गिऱ्हे
‘दिंडी : वे ऑफ लाइफ’ या लघुपटाची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झाल्याबद्दल कार्यक्रमातील पाहुण्यांच्या हस्ते दिग्दर्शक भैरवनाथ वाकळे व उज्वला वाकळे यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला. यावेळी मानपत्राचे वाचन सॅम्युअल वाघमारे यांनी केले.
सत्काराला उत्तर देताना भैरवनाथ वाकळे म्हणाले की, सोशल मीडियाचा चांगल्या कामासाठी कसा वापर करावा, यासाठी चळवळीतील कार्यकर्त्यांनी हे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे. समाजबदलासाठी वेगवेगळी साधने निर्माण झाली आहेत. मात्र, सध्या मोबाईल सर्वांच्या हातात असून, सोशल मीडियाची साधने सर्वाधिक प्रभावी बनली आहेत.यावेळी त्यांनी ‘दिंडी : वे ऑफ लाइफ’ या लघुपटाच्या चित्रीकरणादरम्यान आलेले अनुभव आणि गमती-जमती सांगितल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. महेबूब सय्यद यांनी केले. यावेळी ॲड. श्याम असावा, सुभाष वारे, युनुस तांबटकर, शाकीर शेख, संध्या मेढे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, प्राध्यापक सॅम्युअल वाघमारे, ॲड. संतोष गायकवाड, इंजि. अभिजीत वाघ, आसिफ खान दुलेखान,रेश्मा आठरे, विलास साठे, राजेंद्र गांधी, वैदेही बल्लाळ, सायली तोरणे, नेहाल घोडके, प्रकाश झावरे, सुधीर लंके, वैशाली तोडमल, वर्षा थोरवे, उज्ज्वला वाकळे, समृद्धी वाकळे, ललिता केदारे, इस्थर रोल्हुपूई, खुशी राजभर, मुस्कान शेख, फिरोज शेख, ऋतुजा शिंदे, ॲड. विद्या शिंदे, मरयम सय्यद, समी सय्यद, रामदास वागस्कर, अर्जुन बोरुडे, संतोष गायकवाड, मोहसीन शेख, विजय केदारे, अतुल देठे, संजय वाघ, किरण डहाळे आदींसह विविध क्षेत्रांतील शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


