अहिल्यानगर | ०८.१० | रयत समाचार
Ahilyanagar AMC: राज्यातील कमी पर्जन्यमान, संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि ‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर १६ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रात किमान १० टक्के पाणी कपात लागू करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरातील पाणीपुरवठ्याचे सूक्ष्म नियोजन करून उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. मात्र, नागरिकांना आवश्यक पाणी मिळावे यासाठी सध्या सुरू असलेल्या दिवसाआड पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

अहिल्यानगर शहराला मुळा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. धरणापासून शहरापर्यंतच्या जलवाहिनीमध्ये कुठेही गळती राहणार नाही, याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज शोधून ते तातडीने दुरुस्त करण्याचे निर्देश पाणीपुरवठा विभागाला दिले आहेत. पाणीपुरवठा करताना होणारी गळती आणि अनावश्यक पाणी वापर कमी करून उपलब्ध पाण्याचा अधिकाधिक कार्यक्षम वापर करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
शहरातील वाहन धुण्याच्या केंद्रांमध्ये महापालिकेच्या पाण्याचा वापर होऊ नये, यासाठी वॉशिंग सेंटरची तपासणी करून आवश्यक आदेश दिले जाणार आहेत. उद्याने, रस्ते, बांधकामे तसेच अन्य कामांसाठी पिण्याच्या पाण्याचा वापरावर बंदी केली जाणार आहे.
अशा कामांसाठी बोअरवेलचे पाणी, प्रक्रिया केलेले सांडपाणी किंवा पुनर्वापरयोग्य पाण्याचा वापर करण्यावर भर दिला जाणार आहे.
….
नळांना तोट्या आवश्यक
कनेक्शनची तपासणी होणार
महापालिकेच्या सर्व पाणी कनेक्शनना सक्तीने तोट्या बसविण्याचे आदेश दिले जाणार आहेत. पाणीपुरवठा विभागाच्या पथकांकडून त्याची तपासणीही केली जाणार आहे. नळ सुरू राहिल्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय, टाक्या ओसंडून वाहणे किंवा पाइपलाइनमधील गळती यावर नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून केले जाणार आहे.

गरजेपुरतेच धरणातून
पाणी उचलणार
मुळा धरणातील उपलब्ध जलसाठ्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी भविष्यात शहराला आवश्यक तेवढेच पाणी धरणातून उचलण्याचे नियोजन केले जाणार आहे. मागणी आणि उपलब्ध साठा यांचा नियमित आढावा घेऊन पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाईल. त्यामुळे सध्या पुरवठ्याच्या वेळेत बदल न करता अनावश्यक पाणी वापरावर नियंत्रण आणण्याची भूमिका महापालिकेने घेतली आहे.
……
नागरिकांचे प्रबोधन
पाणी कपातीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. घरातील नळ सुरू ठेवणे, टाक्या ओसंडून वाहू देणे, वाहन व अंगण धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे, पाण्याचा अनावश्यक वापर करणे आदी प्रकार टाळण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.
सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि सार्वजनिक ठिकाणीही पाणी बचतीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाणार आहे.
……
शासनाच्या निर्देशानुसार शहरातील उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या वेळेत सध्या कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना आवश्यक पाणीपुरवठा केला जाईल; मात्र अनावश्यक वापराला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील. असे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.
……

पाणी बचतीसाठी महापालिकेचा ‘ॲक्शन प्लॅन’
धरण ते शहर जलवाहिनीतील गळतीवर नियंत्रण
पिंपळगाव माळवी येथील अवैध पाणी उपस्यावर कार्यवाही करणे
अंतर्गत वितरण व्यवस्थेतील लिकेज तातडीने दुरुस्त
शहरातील सर्व महापालिका कनेक्शनना तोट्या बसविण्याची सक्ती
सर्व व्हाल्व्ह मन यांना स्पॉटवर थांबण्याचे आदेश
वॉशिंग सेंटरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या वापरावर नियंत्रण
बांधकाम, रस्ते व उद्यानांसाठी पर्यायी पाण्याचा वापर
मनपा पाणी टँकर वाहतूक मध्ये होणारी गळती टाळणे
सोसायट्यांमध्ये टाक्या ओसंडून वाहण्यास प्रतिबंध
पाणी बचतीबाबत नागरिकांचे प्रबोधन
हॉटेल लॉजिंग व्यवसायिक यांचा पाणी वापर तपासून पिण्याचा पाण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी
पर्यायी विहीर / इंधन विहीरचे पाणी वापराने
मुळा धरणातून गरजेपुरतेच पाणी उचलण्याचे नियोजन
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?


