श्रीरामपूर | सलीमखान पठाण
Bank of Maharashtra Shrirampur: श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील ढिसाळ व मनमानी कारभारामुळे ग्राहकांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. शाखेतील सेवा तातडीने सुधारावी, अतिरिक्त कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत तसेच विद्यमान व्यवस्थापनात आवश्यक बदल करावेत, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.
(Bank of Maharashtra Shrirampur) ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, शाखेत वाढती गर्दी असूनही व्यवहारासाठी केवळ एकाच खिडकीवर काम सुरू असते. त्यामुळे पैसे जमा करणे व काढण्यासाठी ग्राहकांना दीर्घकाळ रांगेत थांबावे लागते. चेक व्यवहारासाठी असलेली दुसरी खिडकी मर्यादित स्वरूपात सुरू असते, तर तिसरी खिडकी बहुतांश वेळा बंदच राहते. त्या ठिकाणी कर्मचारी उपस्थित असूनही त्यांच्याकडून इतर कामे केली जात असल्याने संपूर्ण भार एका खिडकीवर येतो.
(Bank of Maharashtra Shrirampur) यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिवसभराची कामे बाजूला ठेवून आलेल्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ग्राहकांनी नवीन कॅशियरला रोख व्यवहार करताना अडचणी येत असल्याचाही आरोप केला आहे.
ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच एका महिला ग्राहकाला १२ हजार रुपये देण्याऐवजी केवळ ७ हजार रुपये देण्यात आले. ही चूक लक्षात आल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात बराच वेळ गेला आणि ग्राहकांना अतिरिक्त प्रतीक्षा करावी लागली.
याशिवाय, पासबुक अद्ययावत करण्यासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांकडून इतर कामे करून घेतली जात असल्याने पासबुक अपडेट करण्याचे कामही रखडत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे.
ग्राहकांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी उत्कृष्ट सेवेसाठी ओळखली जाणारी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सध्या अव्यवस्थित कारभारामुळे चर्चेत आली आहे. वाढती गर्दी असूनही शाखा व्यवस्थापकांकडून परिस्थितीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही ग्राहकांनी केला आहे.
ग्राहकांनी शाखेत पैसे जमा व पैसे काढण्यासाठी स्वतंत्र खिडक्या सुरू कराव्यात, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त काउंटर सुरू करावेत, पासबुक अपडेटसाठी स्वतंत्र कर्मचारी उपलब्ध करून द्यावा तसेच ग्राहकाभिमुख सेवा देण्यासाठी आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी केली आहे.
Observational Short Film | चित्रपटनिर्मिती शिकणाऱ्यांसाठी : निरीक्षणप्रधान लघुपट म्हणजे काय?
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.


