सोलापूर | ५.७ | सलीमखान पठाण
(Muslim Literature) समाजाच्या वेदना, व्यथा आणि वास्तव साहित्याच्या केंद्रस्थानी यायला हवे. कविता मोठ्या प्रमाणात लिहिली जात असली तरी कथा, कादंबरी आणि समाजजीवनाचे प्रतिबिंब असलेल्या साहित्यप्रकारांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. दस्तगीर जमादार यांनी केले.
हे ही पहा : RSYT : अडीच हजार वर्षांपूर्वी विटांवर कोरलेल्या ‘सिंह सेनापती’ कादंबरीचा मराठी अनुवाद
अखिल भारतीय मुस्लीम मराठी साहित्य परिषद आयोजित ‘पुस्तकावर बोलू या’ (Muslim Literature) साहित्य उपक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सोशल महाविद्यालयात आयोजित या कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन, साहित्य चर्चा आणि राज्यस्तरीय कवी संमेलन अशा विविध उपक्रमांना साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
प्रा. जमादार पुढे म्हणाले, डॉ. शकील शेख, डॉ. इ.जा. तांबोळी आणि कवी मुबारक शेख यांनी आपल्या साहित्यकृतींमधून मुस्लीम मराठी साहित्य (Muslim Literature) समृद्ध केले असून त्यांच्या पुस्तकांमुळे मराठी साहित्यविश्वात मोलाची भर पडली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. सचिव अय्यूब अहमद नल्लामंदू यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करत उपस्थितांचे स्वागत केले.
उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. इ.जा. तांबोळी, प्राचार्य डॉ. शकील शेख, खजिनदार हसीब नदाफ, मुबारक शेख, इक्बाल बागबान आणि मजहर अत्लोळी यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर अनिसा शेख (दौंड) यांच्या ‘काव्य सप्तक’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
साहित्य चर्चेच्या सत्रात विविध पुस्तकांवर अभ्यासपूर्ण मते मांडण्यात आली. ‘श्यामचा बाप’ या कादंबरीवर भाष्य करताना कवी खाजा भाई बशीर बागबान यांनी व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारे कुटुंब, शिक्षणासाठी संघर्ष करणारा युवक, जातधर्माच्या भेदभावामुळे होणारी उपेक्षा आणि मातृत्वाचा त्याग यांचे प्रभावी चित्रण या कादंबरीत असल्याचे सांगितले.
डॉ. शकील शेख यांच्या ‘जुबा’ या कादंबरीवर बोलताना डॉ. सुरैय्या परवीन जहागीरदार यांनी ही कादंबरी उपेक्षितांच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करणारी सामाजिक दस्तऐवज असून धर्म, सत्ता आणि द्वेष यांच्या पलीकडे मानवतेचाच विजय होतो, असा प्रभावी संदेश देणारी असल्याचे नमूद केले.
कवी मुबारक शेख यांच्या ‘अजान आणि चालिसा’ या काव्यसंग्रहावर भाष्य करताना प्रा. बी. एच. करजगीकर यांनी या संग्रहात गरीबी, शिक्षणाचा अभाव, सामाजिक वास्तव आणि मानवी संघर्षाचे अत्यंत संवेदनशील चित्रण असल्याचे सांगितले. तसेच साहिर लुधियानवी, उस्ताद बिस्मिल्लाह खान, बेगम हजरत महल, फातिमाबी शेख, मीना कुमारी आणि मकबूल फिदा हुसेन यांसारख्या व्यक्तिमत्त्वांचा कवितांमधून नव्या पिढीशी परिचय करून देण्याचा प्रयत्नही उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. महंमद शेख यांनी सूत्रसंचालन, तर हसीब नदाफ यांनी आभार प्रदर्शन केले.
दुपारच्या सत्रात अनिसा शेख (दौंड) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय कवी संमेलन रंगले. राज्यभरातून आलेल्या कवी कवयित्रींनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि मानवी मूल्यांवर आधारित कविता व गझल सादर करून रसिकांची दाद मिळवली. सहभागी सर्व कवींना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाला ॲड. हाषम पटेल (लातूर), फखरोदीन शेख (अकलूज), इलीयास सिद्दीकी, प्रा. आफताब मुल्ला, इक्बाल बागबान, नाना गव्हाण, अबुबकर नल्लामंदू, हमीद शेख, हुसेन नदाफ, करीम सय्यद, शब्बीर जमादार, फय्याज शेख, आफताब मुल्ला यांच्यासह साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Human Right | लोकशाहीचा प्राणवायू धोक्यात? महाराष्ट्राच्या नव्या RTI कायद्याविरोधात जनांदोलनाची गरज
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



