Masterchef Contest | चव, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा संगम! छबिलदास स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा- 26-27’ संपन्न - Rayat Samacharछबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची Masterchef Contest 2026-27 उत्साहात संपन्न

Masterchef Contest | चव, कल्पकता आणि आत्मविश्वासाचा संगम! छबिलदास स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा- 26-27’ संपन्न

३८ विद्यार्थ्यांचा सहभाग; विद्यार्थ्यांनी जिंकली परीक्षकांची मने

रयत समाचार वृत्तसेवा
4 Min Read
दादर येथील छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलच्या ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरवSubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २६.६ | रयत समाचार (राम कोंडीलकर यांच्याकडून)

शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकांपुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणाऱ्या जीवनकौशल्यांचे संवर्धन करणे, हीच खरी शिक्षणाची व्यापक संकल्पना आहे. याच विचारातून दादर येथील छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE Affiliated) तर्फे आयोजित करण्यात आलेली Masterchef Contest म्हणजेच ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’ उत्स्फूर्त वातावरणात संपन्न झाली. २४ व २५ जून २०२६ रोजी पार पडलेल्या या दोन दिवसीय स्पर्धेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद लाभला.

छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलच्या Masterchef Contest २०२६-२७ मध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करताना मान्यवर

उन्हाळ्याच्या सुट्टीचा विधायक उपयोग व्हावा, विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबनाची भावना रुजावी, तसेच दैनंदिन जीवनात उपयुक्त ठरणारी कौशल्ये आत्मसात करण्यास प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने शाळेने विद्यार्थ्यांना महिनाभर विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचा सराव करण्यासाठी प्रेरित केले होते. त्यातूनच या अनोख्या आणि कौशल्यवर्धक Masterchef Contest स्पर्धेची संकल्पना साकारली.

Masterchef Contest स्पर्धेचे उद्घाटन दादरमधील प्रसिद्ध मामा काणे उपाहारगृहाचे मालक श्रीधर कमलाकर काणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी ‘चैतन्य – अस्सल मालवणी भोजनगृह’च्या संचालिका सायली वाळके यांची विशेष उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाककला क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाले, तसेच सर्जनशीलतेला योग्य मंचही मिळाला.

संस्थेचे अध्यक्ष शैलेंद्र साळवी यांनी यावेळी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक ज्ञानाबरोबरच जीवनोपयोगी कौशल्यांचे शिक्षणही अत्यावश्यक आहे. ‘मास्टरशेफ’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि स्वावलंबन वाढविण्यास मोलाची मदत करतात.
शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल मॅडम म्हणाल्या, प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एखादा सुप्त गुण दडलेला असतो. त्या गुणांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि शिक्षणाला आनंददायी अनुभव बनविणे, हा या उपक्रमामागील मुख्य हेतू आहे.
या स्पर्धेचे आयोजन एखाद्या टेलिव्हिजन रियालिटी शोप्रमाणे कल्पक, शिस्तबद्ध आणि आकर्षक पद्धतीने करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या पाककौशल्यांना वाव मिळावा, त्यांची सादरीकरण क्षमता वृद्धिंगत व्हावी आणि खाद्यव्यवसाय क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा अनुभव त्यांना मिळावा, या दृष्टीने नामवंत मान्यवरांना परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
उद्घाटन समारंभातील प्रमुख पाहुणे श्रीधर काणे यांनी विद्यार्थ्यांच्या पाककौशल्याचे कौतुक करताना सांगितले, विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पदार्थांमध्ये कल्पकता, मेहनत आणि आत्मविश्वास स्पष्टपणे जाणवला. अशा उपक्रमांमधून मुलांमध्ये जीवनभर उपयोगी पडणारी कौशल्ये विकसित होतात.
पहिला दिवस : ग्रेड ६ चा स्वादिष्ट जलवा
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ग्रेड ६ मधील विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे पोहे आणि चहा तयार करून आपल्या पाककलेची झलक सादर केली. पदार्थांची चव, मांडणी आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणामुळे उपस्थित मान्यवरही प्रभावित झाले.
ग्रेड ६ निकाल : प्रथम: कवीश कोलते. द्वितीय: आदित्य पाटील. तृतीय: अथर्व सुर्वे. उत्तेजनार्थ: पर्व खंडोर.
दुसरा दिवस : ग्रेड ७ आणि ८ ने जिंकली मने
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मराठी मनोरंजन क्षेत्रातील अभिनेते, लेखक, दिग्दर्शक तसेच ‘पिठी भात’ उपाहारगृहाचे मालक समीर खांडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचे कौतुक करत त्यांनी शाळेच्या या अभिनव उपक्रमाचे विशेष अभिनंदन केले.
यावेळी समीर खांडेकर म्हणाले, छबिलदास शाळेने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देत शिक्षणाची व्यापक संकल्पना प्रत्यक्षात साकारली आहे. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास आणि सर्जनशीलता निश्चितच वाढते.
दुसऱ्या दिवशी ग्रेड ७ आणि ग्रेड ८ मधील विद्यार्थ्यांनी कटलेट, पराठे आणि चहा तयार करून परीक्षकांची मने जिंकली. पदार्थांची चव, स्वच्छता, मांडणी आणि कल्पकता या सर्व बाबींमध्ये विद्यार्थ्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
ग्रेड ७ निकाल : प्रथम: स्वर्णिका सुर्वे. द्वितीय: आराध्या विरले. तृतीय: अवनी राऊळ. उत्तेजनार्थ: श्राव्या पालवणकर.
ग्रेड ८ निकाल : प्रथम: गौरी पोतदार. द्वितीय: अजान शेख. तृतीय: आरोही शाह. उत्तेजनार्थ: क्रिशवी पटेल.
या दोन दिवसीय स्पर्धेत एकूण ३८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. त्यापैकी २० विद्यार्थ्यांना सहभाग व गुणवत्ता प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. ग्रेड ६ मधील विद्यार्थ्यांनी पोहे व चहा, ग्रेड ७ मधील विद्यार्थ्यांनी कटलेट व चहा, तर ग्रेड ८ मधील विद्यार्थ्यांनी पराठे व चहा तयार करून आपल्या पाककौशल्याचा उत्कृष्ट आविष्कार घडविला.
विद्यार्थ्यांची कल्पकता, सादरीकरण कौशल्य, स्वच्छता, चव आणि आत्मविश्वास या सर्व पैलूंना परीक्षकांनी विशेष दाद दिली. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी घेतलेल्या परिश्रमांचेही कौतुक करण्यात आले.
शिक्षणासोबत जीवनकौशल्यांचा विकास घडवून आणणाऱ्या या अभिनव उपक्रमामुळे छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Yoga Day | 21जून आंतरराष्ट्रीय योगदिन : यम-नियमांची एैशी तैशी; टी.एन. परदेशी यांचा ‘योगसंवाद’ वाचा

- Advertisement -

India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; ईसमाद प्रकाशनचे 1 पहिले मराठी पुस्तक


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading