नगर तालुका | १९.६ | विजय मते
(Education) अहिल्यानगर तालुक्यातील नांदगाव येथे शेतकऱ्यांना आधुनिक व शास्त्राधारित शेतीविषयी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी महाविद्यालय, विळद घाट यांच्या वतीने कृषिदूत ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमांतर्गत कृषिदूत पुढील १० आठवडे (अडीच महिने) गावात वास्तव्यास राहून शेतकऱ्यांना विविध कृषी तंत्रज्ञानाचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करणार आहेत.
(Education) महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न असलेल्या या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळावा आणि शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक कृषी संशोधनाचा लाभ पोहोचावा, या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
(Education) महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ. सोमेश्वर राऊत, कार्यक्रम समन्वयक प्रा.किरण दांगडे, कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दीपिका मावळे तसेच विविध विषयांच्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली सुयोग सोनवणे, आदित्य झराड, प्रेम तुपकर, आदित्य शेलार, अजिंक्य तळेकर, यश ताम्हाणे आणि कार्तिक सुरडकर हे कृषिदूत नांदगाव परिसरातील शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
या कार्यानुभव कार्यक्रमात माती परीक्षण, फळबाग लागवड, सेंद्रिय शेती, बीज प्रक्रिया, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, शेतीतील आधुनिक अवजारांचा वापर, शेतीचे आर्थिक नियोजन तसेच जनावरांचे लसीकरण यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर प्रात्यक्षिके व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सरपंच सखाराम सरक, उपसरपंच मीराबाई कोळेकर, ग्रामसेवक निकिता पिंपळे, कृषी सहाय्यक ज्योती पाचारणे, ग्रामपंचायत सदस्य आणि परिसरातील शेतकऱ्यांचे सहकार्य लाभत असल्याची माहिती प्राचार्य डॉ. सोमेश्वर राऊत यांनी दिली.
ग्रामीण भागातील शेती अधिक शाश्वत, उत्पादनक्षम आणि वैज्ञानिक पद्धतीने विकसित करण्यासाठी अशा कृषी जागरूकता कार्यक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरत असून, विद्यार्थ्यांनाही प्रत्यक्ष शेतीचा अनुभव मिळत असल्याने हा उपक्रम कृषी शिक्षण आणि शेतकरी यांच्यातील प्रभावी दुवा ठरत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.




