कोल्हापूर | ५.६ | रयत समाचार
(History) ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि पुरोगामी विचारांचे अभ्यासू इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांना राजर्षी शाहू स्मारक ट्रस्टचा प्रतिष्ठेचा ‘राजर्षी शाहू पुरस्कार’ मरणोत्तर जाहीर झाला आहे. शाहू विचारांचा आजन्म ध्यास घेऊन इतिहास संशोधनाला लोकप्रबोधनाची दिशा देणाऱ्या पवार सरांना मिळालेला हा सन्मान म्हणजे त्यांच्या प्रदीर्घ वैचारिक कार्याला दिलेली उचित आदरांजली मानली जात आहे.
(History) राजर्षी शाहू महाराजांच्या जयंतीदिनी म्हणजेच २६ जून रोजी कोल्हापुरात हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून, विशेष म्हणजे याच दिवशी पवार सरांच्या निधनानंतरची तिसरी मासिक स्मृतिदिनही आहे.
(History) इतिहासाकडे पाहण्याची चिकित्सक, संशोधननिष्ठ आणि सत्याधिष्ठित दृष्टी ही डॉ. पवार यांच्या लेखनाची ओळख होती. ‘महापुरुष इतिहास घडवतात; पण ते त्यांच्या काळाचे अपत्यही असतात, या त्यांच्या भूमिकेतून इतिहासाचे बहुआयामी आकलन दिसून येते. इतिहास म्हणजे केवळ सनावळ्या किंवा घटनांची मांडणी नसून तो समाजप्रबोधनाचा विषय आहे, ही भूमिका त्यांनी सातत्याने मांडली.
३० डिसेंबर १९४१ रोजी सांगली जिल्ह्यातील तडसर येथे जन्मलेल्या डॉ. पवार यांनी इतिहास संशोधन, अध्यापन, लेखन आणि संपादन या क्षेत्रांत मोलाचे योगदान दिले. शिवाजी विद्यापीठातील मराठा इतिहास विभागात संशोधनाचा अनुभव घेतल्यानंतर त्यांनी तीन दशकांहून अधिक काळ अध्यापन क्षेत्रात काम केले. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची वेगळी ओळख होती.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून राजर्षी शाहू महाराजांपर्यंतच्या इतिहासाची पुरोगामी, तुलनात्मक आणि लोकाभिमुख मांडणी हे त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य होते. ‘राजर्षी शाहू छत्रपती : जीवन आणि कार्य’, ‘छत्रपती संभाजी : एक चिकित्सा’, ‘मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध’, ‘शिवचरित्रातून काय शिकावे?’ ‘क्रांतिसिंह नाना पाटील चरित्र’ यांसारख्या पन्नासहून अधिक ग्रंथांमधून त्यांनी इतिहासाला संशोधनाची नवी दिशा दिली.
विशेषतः ‘राजर्षी शाहू पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ’ हा त्यांच्या संशोधन प्रवासातील मैलाचा दगड मानला जातो. दोन हजार पृष्ठांहून अधिक विस्तारलेल्या या ग्रंथामधून शाहू महाराजांचे जीवनकार्य, भाषणे, आदेश, पत्रव्यवहार आणि सामाजिक विचारांचे विस्तृत दस्तावेजीकरण करण्यात आले आहे.
इतिहासाच्या विकृत मांडणीतून संकुचित राजकारण पुढे रेटले जात असताना, डॉ. पवार यांचे संशोधन आणि लेखन वस्तुनिष्ठतेचे महत्त्व अधोरेखित करणारे ठरते. त्यांनी इतिहास संशोधनासोबतच अनेक अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थ्यांची पिढी घडवली.
इतिहास हे राष्ट्राचे आत्मचरित्र असते, असे म्हटले जाते. त्या अर्थाने डॉ. जयसिंगराव पवार यांच्या लेखनातून मराठेशाही आणि आधुनिक महाराष्ट्राचे आत्मचरित्र समोर येते, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही.
अनेक पुरस्कारांनी गौरवलेल्या या अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला अलीकडेच जीवनगौरव पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. मात्र, कोणत्याही पुरस्कारापलीकडे जाणारे संशोधन, अभ्यास आणि सत्यशोधन हीच त्यांची खरी ओळख राहिली.
एक मोठा प्रज्ञावंत इतिहासकार काळाच्या पडद्याआड गेला असला, तरी त्यांचे विचार, संशोधन आणि लेखन पुढील पिढ्यांना सतत प्रेरणा देत राहील, हीच त्यांना खरी मानवंदना ठरेल.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
