मुंबई | रयत समाचार
(Politics) देशाचे माजी संरक्षण मंत्री, रेल्वेमंत्री, लढाऊ कामगार नेते आणि एकेकाळचे ‘बंद सम्राट’ म्हणून ओळखले जाणारे जॉर्ज फर्नांडिस यांच्या जयंतीनिमित्त दक्षिण मुंबईतील लालचंद हिराचंद मार्ग आणि दादाभाई नवरोजी मार्ग यांदरम्यानच्या चौकास त्यांचे नाव देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आलेल्या प्रमुख लोकप्रतिनिधींनी अनुपस्थिती दर्शवल्याने अखेर सफाई कामगारांच्या हस्तेच चौकाचे नामकरण करण्यात आले.
(Politics) ही माहिती देताना प्रभाकर नारकर यांनी सांगितले की, या कार्यक्रमाला राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे तसेच स्थानिक नगरसेवक हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकर उपस्थित राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.
(Politics) सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, जॉर्ज फर्नांडिस यांच्यासारख्या राष्ट्रीय स्तरावरील नेत्याच्या स्मरणार्थ आयोजित कार्यक्रमाकडे प्रमुख नेत्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. कार्यबाहुल्य, अन्य कार्यक्रम किंवा जनतेच्या प्रश्नांमध्ये व्यस्त असल्याने कोणीही उपस्थित राहू शकले नसल्याची चर्चा असली, तरी या अनुपस्थितीबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
विशेष म्हणजे, आयुष्यभर कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या जॉर्ज फर्नांडिस यांना अखेर त्यांच्या विचारांशी सर्वाधिक जवळीक असलेल्या सफाई कामगारांनीच मानवंदना दिली. ज्या कामगार वर्गासाठी त्यांनी आयुष्यभर लढा दिला, त्याच वर्गातील सहा सफाई कामगारांच्या हस्ते चौकाचे नामकरण करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळेच प्रतीकात्मक महत्त्व प्राप्त झाले.
राजकीय नेत्यांच्या अनुपस्थितीत झालेला हा सोहळा उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरला असून, जॉर्ज फर्नांडिस यांच्या कार्याची आठवण करून देणारा आणि कामगार चळवळीतील त्यांच्या योगदानाला सलाम करणारा ठरला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
