जालना | ३१.५ | रयत समाचार
(Politics) मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे भर उन्हात आमरण उपोषणाला बसलेले मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी अखेर रविवारी मध्यरात्री आपले उपोषण स्थगित केले. राज्य सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर आणि मराठा आरक्षण अभ्यासकांनी सुचवलेल्या महत्त्वाच्या दुरुस्त्या स्वीकारल्यानंतर रात्री १:१५ वाजता पाणी पिऊन त्यांनी उपोषण मागे घेतले.
(Politics) राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजप आमदार प्रसाद लाड यांनी मध्यरात्री उपोषणस्थळी जाऊन जरांगे यांच्याशी चर्चा केली. यावेळी सरकारने तयार केलेल्या विशेष मसुद्यावर मराठा अभ्यासक, नेते आणि सरकारमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झाले.
(Politics) सरकारने मान्य केलेल्या प्रमुख मागण्या : २ जूनपर्यंत शासन निर्णय (GR): सरकारने नव्या मसुद्यानुसार येत्या २ जूनपर्यंत अधिकृत शासन निर्णय काढण्याचे लेखी आश्वासन दिले. ५८ लाख कुणबी नोंदींचे दस्तावेज : कुणबी नोंदी सापडलेल्या लाभार्थ्यांचे दस्तावेज जरांगे पाटील यांच्याकडे सुपूर्द केले जाणार असून प्रमाणपत्र वाटप तातडीने सुरू होणार. सातारा गॅझेटियरसाठी मुदत : सातारा गॅझेटियरच्या अंमलबजावणीसाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली असून या काळात प्रमाणपत्र वाटप सुरू राहणार आहे. स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष : मंत्रालयात स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हेल्पलाईन सुरू करण्याचा निर्णय. शिंदे समितीला मुदतवाढ : न्या. शिंदे समितीला आणखी एका वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय.
२ जूननंतर आदेश नाही, तर पुन्हा उपोषण : उपोषण मागे घेताना मनोज जरांगे यांनी सरकारला थेट इशारा देत म्हटले, आम्ही सरकारला २ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. आदेश निघाले नाहीत तर पुन्हा उपोषण सुरू करू.
आरक्षण प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई झाली तर त्यासाठी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड जबाबदार असतील, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.
प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल : शनिवारी दिवसभर ४० अंशांपेक्षा अधिक तापमानात उघड्यावर उपोषण केल्यामुळे आणि अन्नपाण्याचा त्याग केल्याने जरांगे यांची प्रकृती खालावली. त्यामुळे उपोषण स्थगित केल्यानंतर त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
