Politics | जनतेला काटकसर, मग शक्तीपीठ महामार्गाचा हजारो कोटींचा बोजा कशासाठी? राजू शेट्टींचा फडणवीसांना परखड सवाल

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | रयत समाचार

(Politics) देशावर आर्थिक संकटाचे सावट असल्याचे सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नागरिकांना इंधनाचा वापर कमी करण्याचे, खाद्यतेलात १० टक्के बचत करण्याचे तसेच सोने खरेदी टाळण्याचे आवाहन करीत आहेत. मात्र दुसरीकडे राज्य सरकार गरज नसलेल्या प्रकल्पांवर हजारो कोटींची उधळपट्टी करत असल्याचा आरोप करत राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पावर जोरदार टीका केली आहे.

(Politics) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सामाजिक माध्यमावर व्यक्त होताना म्हटले, जनतेने काटकसर करायची, इंधन कमी वापरायचे, खर्च आवरायचा आणि सरकार मात्र रत्नागिरी- नागपूर महामार्गाला समांतर असलेला गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग उभारणार आहे. या प्रकल्पामुळे राज्यावर तब्बल १ लाख कोटी रुपयांचे कर्ज वाढणार असून ५० हजार कोटींचा भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे. हे नेमके कोणाच्या हितासाठी चालले आहे? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

(Politics) राजू शेट्टी यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधत, एका बाजूला जनतेला त्यागाचे धडे दिले जात आहेत, तर दुसरीकडे राज्याच्या तिजोरीवर अनावश्यक आर्थिक बोजा टाकणारे प्रकल्प पुढे रेटले जात आहेत, अशी टीका केली.
शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पामुळे शेतजमिनी, पर्यावरण आणि ग्रामीण भागावर मोठा परिणाम होणार असल्याचा दावा करत या प्रकल्पाला राज्यभरातून विरोध वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
राजकीय आणि सामाजिक वर्तुळात शेट्टी यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली. यामुळे सत्ताधारी यांचे दुटप्पी वागणे जनतेसमोर येत आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading