अहमदनगर | २०.५ | रयत समाचार
(India news) स्पर्धा परीक्षांमधील यशासाठी चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती या बाबी अजिबातच गरजेच्या नाहीत. त्यासाठी फक्त जिद्द, चिकाटी व मेहनत ही त्रिसुत्रीच खरा मंत्र आहे, असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंट या पदावर नियुक्ती झालेले महेश जंजिरे यांनी केले.

(India news) अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या येथील रेसिडेन्सिअल हायस्कूलचे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्रीय पोलिस दलात असिस्टंट कमांडंट या पदावर थेट निवड झाली असून, खडतर प्रशिक्षणानंतर ते आता देशसेवेत रुजू होत आहेत. त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड. विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते जंजिरे यांचा एका खास समारंभात विशेष गौरव करण्यात आला. त्यावेळी दरे बोलत होते. संस्थेच्या खजिनदार ॲड. दीपलक्ष्मी म्हसे, सहसचिव मुकेश मुळे, कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे, बांधकाम व्यावसायिक असलेले महेश यांचे वडील ईश्वर जंजिरे, महिला बचतगटाच्या नेत्या असलेल्या आई सुनीता जंजिरे, वास्तुविशारद पत्नी काजल जंजिरे, ‘रेसिडेन्शियल’चे प्राचार्य धनंजय म्हस्के, उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, संस्थेच्या शिवाजी सहकारी भांडाराचे अध्यक्ष प्रा. रवींद्र देवढे, शिक्षक नेते प्रा. डॉ. सुधाकर सुंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, पालक, कर्मचारी व विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(India news) दरे व आठरे पाटील यांनी जंजिरे यांच्या ‘युपीएससी’तील अभूतपूर्व यशाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील तसेच परिस्थितीशी झगडत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी महेश जंजिरे यांची ‘युपीएससी’तून थेट असिस्टंट कमांडंट या पदावर बाजी मारल्याची ही यशोगाथा प्रेरणादायी आहे, अशा शब्दांत या दोन्ही पदाधिकाऱ्यांनी जंजिरे यांचा गौरव केला.
महेश जंजिरे यांनी यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेबाबत विशेष मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘राज्य व देश पातळीवरील स्पर्धा परीक्षेत मराठी मुलांचा टक्का पूर्वी फारच कमी होता. आता तो वाढत असला तरी अपेक्षेएवढा नाही. अनेक विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या भौतिक सुविधा व मजबूत आर्थिक परिस्थिती याशिवाय स्पर्धा परीक्षेत यश मिळूच शकत नाही, असा न्यूनगंड आहे. परंतु ते साफ चुकीचे असून, जिद्द, चिकाटी व मेहनत या त्रिसुत्रीची प्रभावी अंमलबजावणी करणा-यांना स्पर्धा परिक्षेतील यशापासून कोणीही रोखू शकत नाही.
‘रेसिडेन्शियअल’चे प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू विशद केला. उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर, प्रा. रवींद्र देवढे, प्रा. सुधाकर सुंबे आदींनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमानंतर खाकी वर्दीतील रुबाबदार व्यक्तिमत्व दिसत असलेल्या महेश जंजिरे यांना उपस्थित विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी कुतुहलापोटी अक्षरश: गराडा घातला. अनेकांनी त्यांच्या सह्या घेतल्या तर काहींनी त्यांच्या वर्दीकडे चौकस कटाक्ष टाकीत महेश यांचेशी हस्तांदोलन करण्यावर भर दिला. काही चुणचुणीत विद्यार्थी व विद्यार्थिनी तसेच काही उत्साही पालक यांनी महेश यांच्यावर राज्य व केंद्रीय पातळीवरील स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत, वाचनाची सवय, सामान्य ज्ञान, विषयांची निवड यासह इतर विविध प्रश्नांची सरबत्ती केली. महेश जंजिरे यांनीही स्वत:च्या खास शैलीत विद्यार्थी व पालकांना ओघवत्या व अत्यंत सोप्या भाषेत ही माहिती दिली. इतकेच नव्हे, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची जिद्द असलेल्यांना आपण सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करु, असेही त्यांनी आश्वासित केले.
History | आचार्य प्र.के.अत्रे दिग्दर्शित ‘महात्मा फुले’ चित्रपट पहाण्यासाठी लिंक
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
