अहमदनगर | २०.४ | रयत समाचार
(India news) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन समोरील मनमाड रोड ते निसर्गनगर, रिंगरोड या पूर्व–पश्चिम मार्गास ‘वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ अहिलाजी भिंगारदिवे’ यांचे नाव देण्याची मागणी सकल भारतीय समाज व देशप्रेमी नागरिकांकडून करण्यात आली.
(India news) यासंदर्भात अहिल्यानगर महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे व महापौर ज्योती अमोल गाडे यांना ठराव मंजूरीसाठी मागणीपत्र देण्यात आले. येत्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडून संबंधित रस्त्याचे नामकरण करण्याचा ठराव मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली. शिष्टमंडळात प्रथम विरोधी पक्ष नेता भैरवनाथ वाकळे, युनूसभाई तांबटकर, इंजि. अभिजीत एकनाथ वाघ, संध्या मेढे, असिफखान दुलेखान आणि संतोष गायकवाड यांचा समावेश होता.
(India news) मागणीपत्रात नमूद करण्यात आले की, ऐतिहासिक अहमदनगर (नुतन अहिल्यानगर) जिल्ह्याचे भूषण असलेले वीरचक्र विजेते हवालदार गोपीनाथ अहिलाजी भिंगारदिवे यांनी १९६५ च्या भारत- पाक युद्धात कच्छच्या रणातील ‘सरदार पोस्ट’ येथे अद्वितीय शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि धैर्याचे दर्शन घडवले. सततच्या मोर्टार व मशीनगनच्या गोळीबारात तसेच सुरुंगांच्या धोक्यात त्यांनी गंभीर जखमी सहकाऱ्याला सुरक्षित ठिकाणी आणत त्याचा जीव वाचवला. हा पराक्रम त्यांनी २० एप्रिल १९६५ रोजी पहाटे सुमारे एक वाजता केला. त्यांच्या या शौर्यपूर्ण कार्याबद्दल भारतीय लष्कराकडून त्यांना ‘वीरचक्र’ हा सन्मान प्रदान करण्यात आला.
हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे यांचा जन्म १ जुलै १९३६ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अहिलाजी भिंगारदिवे होते. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी १८ जानेवारी १९५७ रोजी ते भारतीय लष्कराच्या १ महार रेजिमेंटमध्ये दाखल झाले. त्यांनी घरच्यांना न सांगता सैन्यात भरती होऊन काही दिवसांनी थेट लष्करी गणवेशात घरी येत ज्येष्ठांना सॅल्यूट करून सर्वांना आश्चर्यचकित केले. १९६५ च्या युद्धादरम्यान ते गुजरातमधील कच्छ भागातील सरदार पोस्टवर ‘मोबाईल फायर कंट्रोलर’ म्हणून कार्यरत होते.
महार रेजिमेंटचा इतिहासही गौरवशाली आहे. सुरुवातीला महार समाजातील सैनिकांचा समावेश करण्याच्या उद्देशाने ही रेजिमेंट उभारण्यात आली होती. ब्रिटिश काळात १८५७ नंतर ‘वर्ग रेजिमेंट’ धोरणामुळे महार सैनिकांना सैन्यातून वगळण्यात आले. मात्र पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर १९१७ मध्ये पुन्हा १ महार बटालियन उभारण्यात आली. पुढे मार्च १९२१ मध्ये ती बरखास्त करण्यात आली. १९४१ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नांमुळे बेळगाव येथे १ महार बटालियनची पुनर्स्थापना झाली आणि आधुनिक महार रेजिमेंटची स्थापना झाली.
भारत-पाक संघर्षाची पार्श्वभूमी १९४७ पासूनची असून, जम्मू-काश्मीर प्रश्नामुळे सीमारेषा संवेदनशील राहिली आहे. १९६५ चे युद्ध हे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरे मोठे युद्ध होते. २४ एप्रिल १९६५ रोजी पाकिस्तानने कच्छच्या रणात भारतीय भूभागावर हल्ला करत युद्धाला सुरुवात केली. त्यानंतर ‘ऑपरेशन जिब्राल्टर’द्वारे काश्मीरमध्ये घुसखोरी करण्यात आली.
१० ते १९ एप्रिल दरम्यान विगोकोट- सरदार पोस्ट परिसरात दोन्ही बाजूंनी तोफगोळ्यांची देवाणघेवाण सुरू होती. २० एप्रिल रोजी पाकिस्तानने सरदार पोस्टवर जोरदार हल्ला केला. त्यावेळी १ महार बटालियनचे हवालदार गोपीनाथ भिंगारदिवे निरीक्षण चौकीवर तैनात होते. सततच्या गोळीबारातही त्यांनी कर्तव्य पार पाडत असताना जखमी सैनिकाला सुरुंग क्षेत्रातून बाहेर काढून त्याचा जीव वाचवला.
हवालदार भिंगारदिवे यांनी दाखवलेल्या अतुलनीय शौर्य, मैत्रीभाव आणि कर्तव्यनिष्ठेमुळे त्यांना वीरचक्र प्रदान करण्यात आले. शेवटच्या काळात ते भिंगार परिसरात वास्तव्यास होते. त्यानंतर काही काळ ते मध्यप्रदेशातील सागर येथे राहिले. त्यांच्या कुटुंबात पत्नी बालनबाई भिंगारदिवे, मुलगी सुजाता वसंत यमाजी पाटोळे (जेऊर, ता. जि. अहिल्यानगर) आहेत. तसेच गौतम व महेंद्र भिंगारदिवे हे त्यांचे नातेवाईक भिंगार येथे राहतात.
या मागणीबाबत जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व नगरसचिव मेहेर लहारे, अहिल्यानगर महानगरपालिका यांनाही प्रती पाठविण्यात आल्या.
शहरातील महत्त्वाच्या रस्त्यास या शूरवीराचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करावा आणि नव्या पिढीसमोर प्रेरणादायी आदर्श ठेवावा, अशी भावना व्यक्त केली आहे.
Biodiversity | अहिल्यानगरचा ‘किंगफिशर’ आता पाण्याच्या बाटलीवर; ‘डेक्कन व्हॅली’ मिनरल वॉटर
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
