अहमदनगर | २३.३ | रयत समाचार
(Politics) नालेगाव परिसरातील नेप्तीनाका चौकाजवळ सीनानदीवरील उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू असून, या कामामुळे १६ ते ३० मार्चदरम्यान नेप्तीनाका ते कल्याण रोड हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्यात आली असली तरी त्या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
(Politics) या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी ओबीसी महिला मोर्चा शहर जिल्हाध्यक्षा स्वाती सिरसुल यांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नागरिकांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली.
(Politics) माधवनगरमार्गे वारुळाचा मारुतीकडे जाणारा पर्यायी रस्ता खड्डेमय, अरुंद व खराब अवस्थेत असून वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी ओढे नाले ओलांडून जावे लागत असल्याने पादचाऱ्यांचेही हाल होत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून खडीकरण करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
सीनानदीवरील जुना पूलही जीर्ण अवस्थेत असून त्यावर कठडे नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. तसेच स्ट्रीटलाईट बंद असल्यामुळे रात्री अंधारात प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
नेप्तीनाका चौक ते ठाणगे पेट्रोल पंप हा रस्ताही खड्डेमय झाल्याने दररोज अपघात घडत आहेत. हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्याने मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक येथे होते.
यासर्व बाबींचा विचार करून प्रशासनाने प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. यामध्ये जुन्या पुलावर कठडे बसविणे, पर्यायी रस्त्यांची दुरुस्ती, स्ट्रीटलाईट सुरू करणे, तसेच अवजड वाहनांना बायपासकडे वळविणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.
स्थानिक नागरिकांनीही या मागण्यांना पाठिंबा दिला असून, वेळेत उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
