Literature | तीनशे स्क्वेअर फूट घरातून राज्य वाड्मय पुरस्कारापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास; ‘इत्रनामा’ला राज्य वाड्मय पुरस्कारांतर्गत ह.ना. आपटे पुरस्कार

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | ३.३ | रयत समाचार

(Literature) तीनशे स्क्वेअर फूट घरांच्या चाळीत वाढलेलं बालपण, वाचनासाठी वर्तमानपत्र हा एकमेव आधार आणि दोन किलोमीटरवरच्या घरगुती ग्रंथालयासाठी धडधडत्या मनाने मागितलेली फी… या साध्यासुध्या पार्श्वभूमीतून सुरू झालेला प्रवास राज्यस्तरीय सन्मानापर्यंत पोहोचला. ‘इत्रनामा’ या कादंबरीला स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कारांतर्गत हरी नारायण आपटे पुरस्कार २०२४ मिळाला. साहित्यविश्वात या यशाची दखल घेतली.

(Literature) अधिक माहिती देताना लेखिका हिनाकौसर खान यांनी सांगितले, चाळीतलं बालपण कधीच झोपडपट्टीसारखं वाटलं नाही. घरं पक्की होती, शाळा सोबत वाढत होती आणि ग्रंथालयही आकार घेत होतं. मात्र वाचनाची खरी गोडी लागली ती वर्तमानपत्रातून. नंतर घरगुती ग्रंथालयाची माहिती मिळाल्यावर फी मागताना भीती वाटली; पण आई-वडिलांनी कोणतीही कुरकुर न करता पाठिंबा दिला. सुट्टीत एक पुस्तक आणायचं आणि तेच पुस्तक स्वतःसोबत आजोबा व मैत्रीण मिळून वाचायचं, हीच त्या काळातील ‘वाचनसंस्कृती’ होती.

(Literature) त्या पुढे म्हणाल्या, शाळेतील ग्रंथालय पूर्ण सक्षम नसल्याने मुख्यतः चरित्रात्मक पुस्तकं मिळायची. लहानपणी ती वाचताना धास्ती वाटायची; तरीही मिळेल ते वाचन सुरू होतं. कॉलेजात गेल्यावर वाचनाचं दालन विस्तारलं. घरात कधीच वाचनाला विरोध नव्हता, उलट प्रोत्साहन होतं. “धार्मिक पुस्तकं का नाही वाचत?” असा सूर कधीमधी आसपास उमटायचा; पण आई-वडिलांनी कधीच बंधनं घातली नाहीत. वाचनाची आवड आहे, हेच त्यांना अभिमानाचं वाटायचं.

याच मुक्त वातावरणात लेखनाची ओढ निर्माण झाली. सुरुवातीला ते काय आणि कसं आहे याची स्पष्ट जाणीव नव्हती; मात्र लिहिणं आपलं आहे, ही भावना बळावत गेली. वाट निवडताना आई-वडिलांनी कायम साथ दिली. वडिलांच्या निधनाला सहा वर्षे पूर्ण होत आली असली, तरी प्रत्येक पुस्तक, प्रत्येक पुरस्काराच्या वेळी त्यांची आठवण जागी होते. छोट्या-छोट्या गोष्टींनी हरखून जाणारे वडील आज असते तर या सन्मानाने सर्वाधिक आनंदित झाले असते, अशी भावना व्यक्त केली जाते. आईचा अभिमान तिच्या डोळ्यांत स्पष्ट दिसतो, जरी ती शब्दांत फारसं व्यक्त करत नसली तरी, ‘इत्रनामा’ या कादंबरीला मिळालेला हरी नारायण आपटे पुरस्कार हा केवळ साहित्यिक सन्मान नसून एका सामान्य घरातून उभ्या राहिलेल्या वाचन-लेखन संस्कारांचा गौरव आहे.Literature

बालपणी वाचन लेखनाचं विशेष महत्त्व नसतानाही आपल्या परीने साथ देणाऱ्या आई वडिलांना हा पुरस्कार अर्पण करण्याची भावना व्यक्त करत लेखिका हिनाकौसर खान यांनी हा सन्मान त्यांना समर्पित केला आहे.

चाळीतल्या त्या छोट्याशा घरातून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वाचनाची गोडी आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर कोणतीही स्वप्नं दूर नाहीत, हे या यशाने पुन्हा अधोरेखित केलं आहे.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading