मुंबई | २४.२ | रयत समाचार
(India news) उपमुख्यमंत्री कै. अजित पवार यांच्या विमानाला झालेल्या अपघातानंतर नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (Directorate General of Civil Aviation – DGCA) कठोर पाऊल उचलत ‘VSR Ventures Pvt Ltd’ या कंपनीच्या चार Learjet 40/45 विमानांच्या उड्डाणावर तात्काळ बंदी घातली आहे.
(India news) २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे घडलेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर DGCA ने कंपनीचा विशेष सुरक्षा ऑडिट आदेशित केला होता. या बहुविभागीय तपासणीत एअरवर्थिनेस, एअर सेफ्टी आणि फ्लाइट ऑपरेशन्स संदर्भात काही प्रक्रियांचे पालन न झाल्याचे आढळून आले. तसेच देखभाल प्रक्रियेत त्रुटी असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.
(India news) या पार्श्वभूमीवर Learjet 40/45 प्रकारातील VT-VRA, VT-VRS, VT-VRV आणि VT-TRI या नोंदणी क्रमांकांच्या विमानांना तात्काळ ‘ग्राउंड’ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण तांत्रिक तपासणी, उणिवांची पूर्तता आणि सुरक्षा मानके पुनर्स्थापित होईपर्यंत ही विमाने उड्डाण करू शकणार नाहीत.
DGCA ने कंपनीला त्रुटी अहवाल (Deficiency Reports) सादर करण्याचे निर्देश दिले असून, आढळलेल्या उणिवांवर मूळ कारणमीमांसा (Root Cause Analysis) सादर करण्यास सांगितले आहे. त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
प्रवाशांची तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने ही प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
या घडामोडींमुळे राज्यातील खाजगी विमान सेवा क्षेत्रात खळबळ उडाली असून, पुढील काही दिवसांत DGCA चा अंतिम अहवाल महत्त्वाचा ठरणार आहे.
