Education | ‘कापसापासून चरख्यापर्यंत’ इतिहास, विज्ञान आणि पर्यावरणाचा अनोखा संगम; पुणे विद्यापीठात Spin A Yarn of History शिबिर संपन्न

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

पुणे | ५.६ | रयत समाचार

(Education) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विज्ञान शिक्षण आणि संज्ञापन केंद्र (Centre for Science Education and Communication) आणि इतिहास विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘इतिहासाचे धागेदोरे Spin A Yarn of History’ या अनोख्या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. इतिहास, विज्ञान, पर्यावरण आणि वस्त्रोद्योग यांचा परस्परसंबंध उलगडून दाखवणाऱ्या या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, अशी माहिती प्रा.डॉ. श्रध्दा कुंभोजकर यांनी दिली.
(Education) सकाळी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याजवळ सहभागी एकत्र आल्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या स्थापत्यामागील कापसाच्या इतिहासापासून शिबिराची सुरुवात झाली. विद्यापीठाची मुख्य इमारत इतकी भव्य आणि भारदस्त का उभारली गेली, यामागील वसाहतवादी अर्थकारण आणि कापूस व्यापाराचा इतिहास सहभागींना उलगडून सांगण्यात आला.

Education

(Education) अमेरिकेतील १८६१ ते १८६५ दरम्यानच्या यादवी युद्धामुळे इंग्लंडमधील कापडगिरण्यांना अमेरिकन कापूस मिळणे बंद झाल्यानंतर भारतात कापूस उत्पादनाला चालना देण्यात आली. या निर्यातीमुळे ब्रिटिश सरकारला मोठा आर्थिक फायदा झाला आणि त्याच पैशांत मुंबई, पुणे, महाबळेश्वर यांसारख्या ठिकाणी भव्य वास्तू उभारल्या गेल्या, हा ऐतिहासिक संदर्भ वारसा सहलीदरम्यान स्पष्ट करण्यात आला.

भारतीयांच्या आर्थिक शोषणाविरोधात आवाज उठवणारे दादाभाई नौरोजी, महात्मा जोतीराव फुले आणि महात्मा गांधी यांच्या विचारांची माहिती देवकुमार अहिरे आणि श्रावणी आचार्य यांनी सहभागींना दिली.

शिबिरातील सर्वाधिक आकर्षणाचा भाग म्हणजे माधव सहस्रबुद्धे यांनी सादर केलेले खादी निर्मितीचे प्रात्यक्षिक. शेतातील कापसापासून सरकी वेगळी करणे, धनुकलीवर पिंजून तंतू मोकळे करणे, पेळू तयार करणे आणि चरख्यावर सूत कातणे हा संपूर्ण प्रवास त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिला. पारंपरिक चरख्यासह गांधीजींच्या येरवडा कारावासातील विचारमंथनातून विकसित झालेला ‘येरवडा चरखा’ही सहभागींनी अनुभवला.

Education

शिबिराच्या अंतिम सत्रात रेणुकाताई आणि विज्ञान केंद्रातील संशोधकांनी सहभागी विद्यार्थ्यांना विणकामाचे प्राथमिक धडे देत स्वतः छोटा कापडाचा तुकडा तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. काहीसा वेळ लागला असला तरी स्वतः तयार केलेल्या कापडामुळे सहभागींचा उत्साह ओसंडून वाहत होता.
‘रोटी, कपडा आणि मकान’ यातील कपड्याचा इतिहास, निर्मिती प्रक्रिया, सामाजिक महत्त्व आणि शाश्वत विकासातील त्याचे योगदान याचा व्यापक अनुभव या शिबिरातून सुमारे तीस ते चाळीस सहभागींना मिळाला.
वर्षभर विविध प्रयोग, उपकरणे आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी कार्यरत असलेले विज्ञान शिक्षण आणि संज्ञापन केंद्र हे विज्ञानप्रेमी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी महत्त्वाचे ठिकाण ठरत असून वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाने या केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन प्रा. देवकुमार आहिरे आणि आयोजकांनी केले.

Public issue | तासन्‌तास वीज गेली? ग्राहक नुकसान भरपाई मागू शकतो; महावितरणचे नियम काय सांगतात?


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading