वनिताविश्व, रयत समाचार| ८.३ | माला पारधी
(Women) मैत्रिणींनो, ‘ती’ चे सौभाग्य… विषय जेवढा हळवा आणि संवेदनशील आहे तेवढाच गहन आणि विचार करायला भाग पाडणारासुद्धा आहे. स्त्रियांचे सौभाग्य म्हणजे काय हे जाणून घेण्याआधी ‘सौभाग्य’ या शब्दाचा अर्थ समजून घेऊ. सौभाग्य या शब्दाची व्युत्पत्ती सांगायची झाल्यास त्याचा विग्रह सु + भग असा आहे. आणि भग या शब्दाचा खरा अर्थ स्त्री जननेंद्रीय असा होतो. म्हणजे सौभाग्य हे स्त्री शी संबंधित आहे एवढे नक्की.
(Women) भारतीय पुरुषप्रधान संस्कृतीच्या या परिसरात स्त्री आणि पुरुष यांच्या अनेक कर्तव्यांची रूपरेखा भारतीय पूर्वसुरिंनी स्पष्ट केली आहेत. ही कर्तव्य स्पष्ट करतांना त्यांनी स्त्रियांच्या सर्व स्थितीचा विचार केला आहे. त्यात प्रामुख्याने स्त्रियांचे विवाहपुर्व आयुष्य, विवाहानंतरचे आयुष्य आणि वृद्धत्व होय. या सर्व कर्तव्यात विवाहानंतरचे आयुष्य हे स्त्रीचे खरे वैभवी आयुष्य होय असे सांगितले आहे. या सर्व वैभवाचा स्त्रियांनी परिपूर्ण उपयोग करून घ्यावा आणि त्यायोगे समाजात प्रतिष्ठित म्हणून मिरवावे हाच स्त्रियांच्या आयुष्याचा खरा आनंद होय. या पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीच्या या वैभवलाच ‘सौभाग्य’ असे म्हटलेले आहे.
(Women) मात्र आजच्या काळात लग्न न झालेल्या पण चांगले शिक्षण घेऊन सुशिक्षित, सुसंस्कृत झालेल्या, स्वतःची गुणवत्ता सिद्ध केलेल्या आणि प्रगतीची कित्येक शिखेर पादाक्रांत केलेल्या प्रत्येक यशस्वी स्त्रीला सौभाग्यवती नक्कीच म्हणता येईल. कारण सौभाग्य या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे – ‘ज्यायोगे चांगल्या गोष्टी व घटना घडत असतात, असे चांगलेपणाचे प्रतीक असलेले भाग्य होय.’
पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. उंबरठ्याबाहेरचे विश्व नव्हते. केवळ ‘चूल आणि मुल’, ‘रांधा वाढा नि उष्टी काढा’ एवढेच काय स्त्रियांचे जीवन होते. आणि यालाच त्या मोठ्या आनंदाने आपले सौभाग्य समजत होत्या. परंतु प्रबोधनयुगानंतर मात्र कित्येक समाजसुधारकांच्या महत्प्रयासातून स्त्रिया शिकू लागल्या, लिहू लागल्या, जागृत झाल्या. सुविद्य झाल्या आणि आज सर्वच आघाडीवर पुरुषांच्या खांद्याला खांदा मिळवून आपला नावलौकिक वाढवत आहेत. उपनिषदातील विवेचनानुसार, स्त्री ही स्वतःच सौभाग्यदायीनी असतानाही सांप्रत काळात केवळ पतीच्या जिवंत असण्यावर अथवा नसण्यावर स्वतःचे सौभाग्य ठरवावे, ही आजच्या समाजातील फार मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
आपल्या अवतीभवती असेच काहीसे चित्र आपल्याला बघावयास भेटते. म्हणूनच भवतालचा आढावा घेत कॉ. गीता महाजन आपल्या ‘स्त्रियालिटी’ या पुस्तकातून स्त्रीजीवनातील धगधगते वास्तव मांडताना म्हणतात –
• तुला सौभाग्याच्या जोखडात बांधून…सौंदर्याच्या बाता ठोकून, संपत्ती रक्षणाची सोय करून, तो फिरतो…हा देश, तो देश… बिनधास्त… तू करतेस करवाचौथ त्याच्यासाठी… पाणी न पिता ही.
• ‘सौभाग्यवती भव’ आशीर्वाद कसा जोपासायचा तेही तेच ठरवत असतात… ती मात्र जळत असते दिव्यासारखी… तेल संपेपर्यंत.
• पतिव्रता ती… तो मात्र तिच्या जिवावर उठलेला…बाकीचे बघतात…तमाशा दुरून… काही जवळूनही… चालायचंच म्हणून.
काही मूठभर सुशिक्षित आणि कर्तुत्ववान, अपवादभूत स्त्रिया वगळल्या तर एकंदर आपला स्त्रीसमाज अजूनही अंधारातच चाचपडतो आहे. आपल्या भोवतालच्या सुशिक्षित पदवीधर स्त्रिया आधुनिकतेच्या नावाखाली फॅशनेबल पोशाखात आणि नटण्यामुरडण्यातच धन्यता मानताना दिसतात. त्या बापड्यांना हे सांगावेसे वाटते की, बायांनो, केवळ वरवरचे नाविन्य आणि पोशाखबदल म्हणजे सुधारणा नव्हे !
विहिरीचे पाणी पिण्यायोग्य करावयाचे असेल तर ते वरवर ढवळून त्याची अशुद्धता जाणार नाही, तर त्याच्या मुळातला गाळ उपसून काढला पाहिजे. पण विहिरीत घाण आहे, ती काढली नाही तर पाण्याला दुर्गंधी सुटेल, ही गोष्टच आम्हां स्त्रियांना अजून पटलेली नाही. प्रामाणिकपणे विचार केला तर अजूनही स्त्रियाच स्त्रियांच्या मार्गात आड येतांना, एकमेकींचा सूड उगवतांना, मत्सर करतांना दिसतात. आजच्या विधवा स्त्रियांनी कुंकू लावण्यास सुरुवात केलीय, तर त्या कुंकवाचा परीघ मोजायला दहा स्त्रिया पुढे सरसावतात. स्त्रियांनी अशी संकूचित वृत्ती सोडून एकमेकींप्रती सहानुभूती दाखवणे गरजेचे आहे.
केवळ नवऱ्याच्या वैभव व श्रीमंतीचे गोडवे गात त्यातच हरवून ‘हेच माझे सौभाग्य’ म्हणत मिरवत बसण्यापेक्षा बदलत्या काळातील बदल स्वीकारून, उच्चविद्याविभुषित होऊन, उपलब्ध संधीचे सोने करून, नवऱ्यावरील परावलंबित्वाचा त्याग करून प्रत्येक स्त्रीने स्वतः शारीरिक, मानसिक व बौद्धिकदृष्टीने स्वावलंबी व आत्मनिर्भर बनले पाहिजे. पण याचा अर्थ स्त्रियांनी आपल्या संसाराचा, पतीचा त्याग केला पाहिजे असा मुळीच नाही. तर त्यांच्यासोबत राहून त्यातच हरवून न जाता किंवा पतीलाच आपले सौभाग्य न समजता स्वतःचे अस्तित्व जपायला प्रत्येक स्त्रीने शिकले पाहिजे. याच अर्थाने ज्येष्ठ पंचभाषिक कवित्री आशाताई पांडे म्हणतात,
मागेपूढे तू असावेस का रे
अस्तित्व माझे कळू दे मलाही
‘लहानपणी आई-वडिलांच्या ताब्यात’ ‘तरुणपणी नवऱ्याच्या हुकूमात’ आणि ‘म्हातारपणी मुलांच्या पांजरपोळात’ ही स्त्रियांच्या आयुष्याची सुटसुटीत आणि सोपी घडामोड आहे. याच मार्गाने लाखो स्त्रिया गेल्या आणि जात आहेत. स्त्रीला आईबापाचे, नवऱ्याचे किंवा मुलाबाळांचे बंधनच नको असे माझे मुळीच म्हणणे नाही. तसा गैरसमज कोणी करून घेऊ नये. समाजात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बंधनांची अवश्य जरुरी आहे. पण ती बंधने अशी असावीत की व्यक्तीचे, मग ती पूरुष असो अगर स्त्री असो, तिचे व्यक्तिमत्व आणि अस्तित्व कायम राहिले पाहिजे.
काही पुरुष फार चांगुलपणाने वागणारे दिसतात. बायको कमावती असो वा नसो, तिला बरोबरीने घरकामात मदत करतात. ते अंथरुणावर असली की, तिला त्रास होऊ नये म्हणून जीवाचा आटापिटा करतात. तिच्या मतांचा आदर करतात. अशी उदाहरणे फार थोडी असतात. पण असतात हे काही खोटे नाही. अशावेळी नवऱ्याचे असे वागणे हे निश्चितच स्त्रियांचे सौभाग्य आहे. आणि स्त्रियांनी सुद्धा नवऱ्याची बाजू सांभाळावी लागल्यास माघार न घेणे हे ओघाने आलेच.
पण कित्येक पुरुष व्यसनी, दुराचारी, छळवादी आणि बायकांना सतत मारझोड करणारे असतात. काही ठिकाणी पुरुष व्यसनी नसतात घरात सर्व भौतिक सुबत्ता असतात; परंतु स्त्रियांना समान आदर दिला जात नाही. त्यांची कायम अवहेलना केली जाते. त्यांना फक्त गृहीत धरले जाते. त्यांच्याकडे माणूस म्हणून बघण्याची वृत्ती पुरुषांमध्ये नसते, त्यांना मानसिक स्वातंत्र्य नसते. अशा स्त्रिया आजही आपल्या भवतालच्या समाजात आहेत ज्या केवळ मुलाबाळांची आबाळ होऊ नये म्हणून आतल्या आत अश्रू ढाळीत असतात आणि लोकलाजेस्तव अशा पुरुषांच्या सौभाग्याचे ओझे आयुष्यभर पेलवत प्रचंड मानसिक दडपणाखाली आपले आयुष्य घालवत असतात. अशा स्त्रियांसाठी असे पुरुष म्हणजे सौभाग्य नसून दुर्भाग्यच म्हणावे लागेल. सौभाग्याच्या नावावर इथल्या जाचक पुरुषी व्यवस्थेला त्या बळी जातात.
अशा परिस्थितीत सौभाग्याच्या नावावर केवळ पुरुषाच्या लाथा खात बसण्यापेक्षा आणि अवहेलनीचे धनी होण्यापेक्षा होणाऱ्या अन्यायाला वेळीच विरोध करून माणूस म्हणून आत्मभान जागवून आपल्या हक्क आणि अधिकाराप्रती सजग होऊन आपली वेगळी वाट निर्माण करण्याचे धारिष्ट्य या सर्व स्त्रियांनी दाखविले तर ते नक्कीच त्यांच्यासाठी सौभाग्य ठरेल.
वस्तूतः स्त्री आणि पुरुष एकमेकांचे शत्रु किंवा गुलाम नसून एकमेकांचे जिवलग मित्र आहेत. ज्याप्रमाणे स्त्रीला संरक्षणासाठी पुरुषाची गरज असते त्याचप्रमाणे पुरुषाला ही स्त्रीची गरज जरूर आहे. मात्र आयुष्याची जोडीदारीन म्हणून स्त्रीचा ‘मैत्रीण’ आणि ‘माणूस’ म्हणून अंगिकार केल्याशिवाय पुरुषाच्या आयुष्यालाही पूर्णत्व येऊ शकत नाही. जोपर्यंत सर्व स्त्रियांना जोतिबासारखा पती, नेहरूसांरखा पिता आणि कृष्णासारखा सखा मिळत नाही; तोपर्यंत पुरुष हेच स्त्रियांचे आधारस्तंभ आणि सौभाग्य आहेत अशी खोटी प्रौढी मिरवण्यात काहीच अर्थ नाही.
एकंदर सांप्रत काळात केवळ नवऱ्याचे जिवंत असणे, त्याच्या नावे मंगळसूत्र, जोडवी, बांगड्या, कुंकू, टिकली इ. तथाकथित सौभाग्यालंकार परिधान करणे एवढाच सौभाग्याचा संकुचित अर्थ अभिप्रेत नसून; निर्णयक्षमता, अभिव्यक्तीस्वातंत्र्य, स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मनिर्भरता, आत्मविश्वास आणि आत्मभान ही आजच्या स्त्रियांची खरी सौभाग्यलेणी असली पाहिजेत. तरच त्यांच्या तेजाने कर्वे, आगरकर, जोतिबा, सावित्रीबाई या महात्म्यांनी महत् संघर्षातून निर्माण केलेली प्रकाशवाट उजळून निघेल.
संपर्क : [email protected]



