अहमदनगर | ०८.१० | रयत समाचार
(Women) स्त्रियांच्या चळवळीचा अर्धशतकाचा प्रवास, समाजातील बदल आणि पुढील वाटचालीची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगरमध्ये जिल्हाव्यापी महिला परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद, अहमदनगर आणि ग्रामीण विकास अभ्यास केंद्र (सीएसआरडी) यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद रविवारी ता.१२ ऑक्टोबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत सीएसआरडी सभागृहात होणार आहे.
(Women) १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने आंतरराष्ट्रीय महिला वर्ष घोषित केले होते. त्या घोषणेला यंदा ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पन्नास वर्षांत स्त्रियांच्या जीवनात लक्षणीय बदल झाले. चळवळींनी कायदे बदलवले, सरकारी धोरणे सुधारली, सामाजिक दृष्टिकोन व्यापक झाला. या बदलांचा आढावा घेऊन आगामी काळातील स्त्री चळवळीची दिशा ठरवण्यासाठी महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद हा राज्यव्यापी मंच स्थापन करण्यात आला आहे.
(Women) अहमदनगर जिल्ह्यातील स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि संघटनांनी या मंचाच्या माध्यमातून महिलांच्या प्रश्नांचा सखोल अभ्यास सुरू केला आहे. अलीकडेच जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीतील महिलांच्या सुरक्षिततेचा सर्वेक्षणात्मक अहवाल तयार करण्यात आला आहे. परिषदेचे उद्घाटन सीएसआरडीचे प्राचार्य डॉ. सुरेश पठारे यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या ॲड. निशा शिवूरकर असतील.
दिवसभर चालणाऱ्या या परिषदेत ‘गेल्या पन्नास वर्षातील स्त्री चळवळीचा आढावा’, ‘महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषदेच्या मोहिमा आणि आगामी कार्यक्रम’, ‘भारतीय संविधाना समोरील आक्रमक राष्ट्रवादाचे आव्हान’, ‘अहमदनगर जिल्ह्यातील बेपत्ता झालेल्या मुलींचा प्रश्न’, तसेच ‘स्त्रियांवरील वाढती हिंसा’ यांसारख्या विषयांवर मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेसाठी डॉ. मनीषा गुप्ते, कॉ. लता भिसे-सोनवणे, साथी रमेश अवस्थी यांसारखे ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील विविध महिला संघटना, कार्यकर्त्या आणि नागरिकांनी या परिषदेत मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन नीलिमा जाधव-बंडेलू, कॉ. स्मिता पानसरे, संध्या मेढे, ॲड. निर्मला चौधरी, सरोज आल्हाट, मदिना शेख, ॲड. मीनल देशमुख, सत्यभामा थिटमे यांनी संयुक्तपणे केले आहे.
हे ही वाचा : Womens Power | वनिता विश्व – डॉ. सुलभा जंजिरे पवार; कर्तृत्ववान महिलांची कहाणी