मुंबई | गुरुदत्त वाकदेकर
(Sports) आशिया कप २०२५ मधील सुपर–४ टी-२० सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या थरारक सामन्यात भारतीय फलंदाजांनी आक्रमक खेळ करत पाकिस्तानच्या गोलंदाजांना जराशीही संधी न देता १७२ धावांचे लक्ष्य फक्त १७.२ षटकांत गाठले.
(Sports) भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. सलामीवीर फखर झमान (१५ धावा, ९ चेंडू) हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर उंच झेल मारून बाद झाला. सईम अयूब (२१) शिवम दुबेच्या गोलंदाजीवर झेल देऊन माघारी परतला. हुसैन तलत (१०) यावेळी कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. सलामीला आलेल्या साहिबजादा फरहानने ५८ धावांची महत्वाची खेळी केली, पण शिवम दुबेच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. मोहम्मद नवाज (२१) याला धावचीत बाद केले. आघा सलमान (१७) आणि फहीम अश्रफ फक्त ८ चेंडूत २० धावा ठोकून नाबाद राहिले. भारताकडून शिवम दुबेने २ बळी घेतले, तर कुलदीप यादव आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी १ बळी मिळवला. जसप्रीत बुमराहने बळी मिळवला नाही, पण त्याचा अचूक मारा आणि वेगवान यॉर्कर पाकिस्तानी फलंदाजांची डोकेदुखी ठरली.
(Sports) १७२ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या भारताची सुरुवात आक्रमक ठरली. शुभमन गिल (४७) याला फहीम अश्रफने त्रिफळाचीत बाद केले. अभिषेक शर्माने ३९ चेंडूत ७४ धावा (६ चौकार, ५ षटकार) ठोकल्या आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांना अक्षरशः हतबल केले. कर्णधार सूर्यकुमार यादव (०) हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर झेल देऊन बाद झाला. चाचपडत खेळणारा संजू सॅमसनही (१३) हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत बाद झाला. तिलक वर्मा (३०) आणि हार्दिक पांड्या (७) शेवटच्या टप्प्यात संयमाने खेळत विजयावर शिक्कामोर्तब केले.
या सामन्यातील प्रत्येक धावा आणि बळीला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दुबईतील मैदानावर भारतीय आणि पाकिस्तानी चाहत्यांमध्ये उत्साहाचे वेगळेपण दिसत होते, पण अभिषेक शर्माच्या वादळी खेळीमुळे भारतीय प्रेक्षकांचा जल्लोष दुणावला होता.
या सामन्यातील उत्कृष्ट फलंदाजीसाठी अभिषेक शर्मा याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. त्याच्या आक्रमक खेळामुळे भारताने विजय धावसंख्या गाठली आणि स्पर्धेतली आपली जागा अधिक भक्कम केली.
स्पर्धेच्या आतापर्यंतच्या सामन्यांनुसार भारताचा संघ अंकतालिकेत वरच्या क्रमांकावर आहे. सामन्यातील नाट्यमय क्षण, ताणतणाव, आक्रमक खेळ आणि प्रेक्षकांचा उत्साह यांमुळे भारतीय संघाची आघाडी कायम ठेवण्याची ही महत्वाची संधी ठरली आहे.