नगर तालुका | रयत समाचार
(Social) मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत पिंपळगाव माळवी येथे ग्रामस्वच्छता आणि विकास कामांना गती देण्यासाठी मोठ्या उत्साहात सामूहिक श्रमदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) दादाभाऊ गुंजाळ आणि गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी स्वतः हातात झाडू घेऊन प्राथमिक शाळा परिसरात स्वच्छता करून उपक्रमाची सुरुवात केली.
(Social) श्रमदानात गावातील मुख्य रस्ते, शाळा परिसर, अमरधाम, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे साफसफाई, झाडांची निगा राखणे आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशी विविध कामे करण्यात आली. प्राथमिक शाळा व श्रीराम विद्यालयातील विद्यार्थ्यांसह गावातील मुख्य रस्त्यावरून फेरी काढून स्वच्छतेचा संदेश जनजागृतीद्वारे देण्यात आला.
(Social) यावेळी बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी दादाभाऊ गुंजाळ म्हणाले, समृद्ध पंचायत राज अभियान हे फक्त योजनेचे नाव नाही, तर गावकऱ्यांच्या मनात स्वच्छता आणि विकासाची ज्योत सतत प्रज्वलित ठेवण्याचे माध्यम आहे. अधिकारी, कर्मचारी मैदानात उतरले तर ग्रामस्थांनाही प्रेरणा मिळते.
गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी हा उपक्रम गावाच्या बदलाची सुरुवात असल्याचे सांगत, हा फक्त एक दिवसाचा उपक्रम नसून गावाचा कायापालट करण्याचे पाऊल आहे, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच मच्छिंद्र झिने, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सागर गुंड, प्राचार्य संभाजी पवार, मुख्याध्यापक गंगाधर लोंढे, मेजर विश्वनाथ गुंड, प्रगती महिला ग्राम संघ अध्यक्ष जयश्री साबळे, अंगणवाडी सेविका, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
