शेवगाव | २२.६ | रयत समाचार
राज्य सरकारने स्मार्ट वीजमीटर (Smart Meter) बसविण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा सर्वसामान्य वीज ग्राहकांची आर्थिक लूट सुरूच राहील, असा इशारा भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव ॲड. सुभाष लांडे यांनी दिला. स्मार्ट मीटरच्या विरोधात सोमवारी ता. २२ जून रोजी शेवगाव येथील संत गाडगेबाबा चौकातील महावितरण कार्यालयासमोर भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली.
(Smart Meter) आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, प्यारेलाल शेख तसेच विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनानंतर महावितरणचे उपअभियंता पगारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना ॲड. सुभाष लांडे म्हणाले, वीज ही सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक गरज असून राज्यातील सुमारे ८५ टक्के लोकसंख्या ही शेतकरी, मजूर, मध्यमवर्गीय, असंघटित कामगार आणि कष्टकरी वर्गातील आहे. विधानसभा निवडणुकांदरम्यान सरकारने स्मार्ट मीटरची सक्ती केली जाणार नाही, अशी हमी दिली होती. मात्र, त्या आश्वासनाला हरताळ फासत महावितरणकडून ग्राहकांची संमती न घेता स्मार्ट मीटर (Smart Meter) बसविण्याचा सपाटा सुरू आहे. अनेक ग्राहकांना मोबाईलवर पूर्वसूचना पाठवून दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
ग्राहकांची परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसविणे हा अन्याय असून यामुळे वीज ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने हा निर्णय मागे घेऊन सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
महावितरणला देण्यात आलेल्या निवेदनात पंजाब आणि तामिळनाडू सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रातही स्मार्ट मीटर न लावण्याचा निर्णय घ्यावा, २०१४ पासून झालेली वीजदरवाढ मागे घ्यावी, वीज उद्योगाचे खासगीकरण थांबवावे, कृषी पंपांसाठी सौरऊर्जेची सक्ती रद्द करावी, घरगुती व शेतकऱ्यांना सामान्य मीटरद्वारे तातडीने वीजजोडणी द्यावी, शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा करावा, नव्या वीजजोडणीसाठी स्मार्ट मीटरची सक्ती थांबवावी तसेच वीज विधेयक २०२५ मागे घ्यावे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात भाकपचे तालुका सचिव संदीप इथापे, तालुका सहसचिव भिवा घोरपडे, बबनराव पवार, दत्तात्रय आरे, बापूराव राशिनकर, ॲड. भागचंद उकिरडे, ॲड. गणेश ताठे, बबन ताठे, ॲड. रजत लांडे, अशोक नजन, रामभाऊ लांडे, मुरलीधर काळे, अर्जुन खैरे, बाळू बागल, आंजाबापू गायकवाड, ॲड. अभिषेक चौधरी, ॲड. शशिकांत भारस्कर, कॉ. विष्णू गोरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.



