सिरसाळा | ११ फेब्रुवारी | प्रतिनिधी
(Religion) आज सर्वत्र जात्यंधता, धर्मांधतेचा वणवा पेटलेला पहायला मिळतोय. प्रत्येकजण एकमेकांकडे संशयाने पहातो आहे, अशा कळात संत विचाराच्या वर्षावाने प्रेमाचा गारवा निर्माण करण्याचे काम शेतकरी कीर्तन महोत्सवातून होत आहे. संत विचारातून सामाजिक सलोखा निर्माण होईल, असा आशावाद प्रसिद्ध कवी अनंत राऊत यांनी व्यक्त केला. शेतकरी कीर्तन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
(Religion) कन्नापूर येथील बसस्थानकाजवळ जगद्गुरू तुकाराम महाराज बीजेनिमित्त शेतकरी कीर्तन महोत्सवाचे उद्घाटन अनंत राऊत यांच्या उपस्थितीत झाले. काॅ. डी.एल. कराड हे अध्यक्षस्थानी होते. जागतिक कीर्तीचे पखवाज वादक उद्धव बापू आपेगावकर आणि कैकाडी महाराज यांचे वंशज, कैकाडी महाराज मठाचे मठाधिपती भारत महाराज जाधव यांच्या हस्ते मृदंग आणि वीणा पूजन झाले.
(Religion) यावेळी बोलताना अनंत राऊत म्हणाले, संतांच्या विचारधारेतून गावखेड्यातील सामाजिक सलोखा भक्कम होता. आमच्या गावच्या महादेवाच्या मंदिरातील हरिनाम सप्ताहात पठाणचाचा कीर्तनकारामागे टाळ घेऊन उभे असत, तर मोहरमचा ताजिया सर्व हिंदू बांधव सजवीत असत. लहानपणी शाळेत सर्व जाती-धर्माचे आम्ही मित्र एकत्र जेवत असू. एकमेकाच्या डब्यात मोकळेपणाने हात घालून एकमेकाची भाजीभाकरी घेत असू. आज अचानक “धर्म खतरे में” असल्याच्या आरोळ्या कानावर येत आहेत. खर तर “ना हिंदू खरे में हैं, ना मुसलमान खतरें में है”. यांचे राजकीय अस्तित्व खतरे में आलं की, तरुणांना धर्माच्या नावाने भडकविले जाते. तेव्हा राजकीय लोकांच्या भूलथापांना बळी पडून गावातील सामाजिक सलोखा, बिघडू देऊ नका, असे आवाहनही राऊत यांनी केले.
संत तुकाराम महाराज हे समाजातील दांभिकतेवर प्रहार करणारे क्रांतीकारी कवी होते. त्यांनी धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या पाखंडाचे खडंण केले, म्हणून त्यांच्या गाथा बुडविण्यात आल्या. आज शेतकरी कीर्तन महोत्सवातून त्याच गाथेचा विचार समाजात रुजविण्याचे प्रयत्न होत आहेत, असेही डॉ. कराड म्हणाले.
रात्रीच्या कीर्तनात ह.भ.प. हरिदास महाराज तम्मेवार यांनी तुकाराम महाराज यांचा ‘जेथे कीर्तन करावे l तेथे अन्न न सेवावे’ हा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडला. त्यावर निरुपण करताना कीर्तन परंपरेला आलेल्या बाजारूपणावर प्रहार केला. वारकरी संप्रदायाचे विचार फक्त बोलण्यात नसावेत. जे मतदानासाठी पैसे घेत असतील, जे स्रीयांचा सन्मान करीत नसतील, जे समाजात जात्यंधता, धर्मांधता, अंधश्रद्धा पसरवत असतील, त्यांनी बुक्का लावू नये भाळा, माळ घालू नये गळा, असे तुकाराम महाराज यांच्या भाषेत ठणकावून सांगितले.
वीणा-मृदंग पूजन प्रसंगी बोलताना उद्धव बापू आपेगावकर यांनी कठरपंथीयांकडू भक्ती परंपरेला लावला जात असलेला सुरुंग अधोरेखित केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील संत परंपरेने भेदभावाला, चमत्काराला थारा न देता सहिष्णुतेचा धर्म जपल आणि वाढवलाही. साधुसंताच्या या व्यापक वारस्याला अलीकडल्या काळात कठरपंथी विकृत धर्मवाद्यांकडून सुरंग लावण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील वारकरी चळवळीला हे उत्तरेकडील स्वयंघोषित संत तिलांजली देण्याची काम करत आहेत. हे थांबवण्यासाठी या कीर्तन महोत्सवातून प्रयत्न होताना पाहून आनंद होत असल्याचा विश्वास पं. उद्धव बापू आपेगावकर यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना भारत महाराज जाधव यांनीही पाखंडावर कठोर शब्दांत प्रहार केले. कुणी अघोरी साधना केली. स्वतःच्या देहाला यातना दिल्या. त्याने जर दुसऱ्याचे कल्याण होत नसेल; तर असे चमत्कार काय कामाचे! शाही स्नानाने अंतकरण शुद्ध होत नसेल तर प्रयागराजला जाण्यात काय अर्थ आहे? यापेक्षा स्वतःचे अंतकरण शुद्ध करून माणसाने माणसासोबत माणसासारखे वागणे, तण मन अंत:करणाची स्वच्छता राखणे, मुलाबाळांना शिकवणे, हे संत नामदेव महाराज -ज्ञानेश्वर महाराजांपासून ते आधुनिक संत घाडगे बाबा, तुकडोजी महाराजांपर्यंत महाराष्ट्राच्या मातीने जपली आहे. तीच धुरा हा शेतकरी कीर्तन महोत्सव पुढे नेत आहे’, असे भारत महाराज जाधव म्हणाले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.