नगर तालुका | २२ मार्च | रयत समाचार
(Religion) तालुक्यातील नेप्ती येथे मुस्लिम समाजाची रमजान ईद (ईद-उल-फित्र) उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित ईद मिलन कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रभावी दर्शन घडले. गावातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होत मुस्लिम समाजबांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गावातील जुनी ऐक्याची परंपरा नव्या पिढीकडूनही पुढे नेली जात असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
(Religion) “रमजान ईद हा आनंद, संयम आणि आपुलकीचा सण आहे. या सणामुळे समाजात परस्पर स्नेह व बंधुभाव अधिक दृढ होतो. नेप्ती गावात सर्व समाज एकत्र येऊन सण साजरे करतात, ही आपली परंपरा आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक नातेसंबंध अधिक घट्ट होतात आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण होते,” असे प्रतिपादन माजी उपसरपंच फारूक सय्यद यांनी केले.
(Religion) सकाळी शाही मस्जिदच्या मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. मौलाना मुनीर सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करून देशात शांतता, सुखसमृद्धी आणि धार्मिक सलोखा टिकून राहावा यासाठी प्रार्थना करण्यात आली, अशी माहिती रामदास फुले यांनी दिली.
संध्याकाळी आयोजित ईद मिलन कार्यक्रमात गावातील वाड्या-वस्तीवरील सर्व समाजातील नागरिक एकत्र आले होते. यावेळी सर्वांनी पारंपरिक शिरखुर्माचा आस्वाद घेत एकमेकांप्रती प्रेम व आपुलकी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण होळकर, माजी उपसरपंच फारूक सय्यद, जिल्हा नियोजन समिती सदस्य शिवाजी होळकर, माजी पंचायत समिती सदस्य देवा होले, सरपंच संजय अशोक जपकर, रामदास फुले, माजी उपसरपंच संजय आसाराम जपकर, दादू चौगुले, जालिंदर शिंदे, चेअरमन सुरेंद्र होळकर, बाबूलाल सय्यद, माजी संचालक वसंतराव पवार, प्रा. एकनाथ होले, मौलाना मुनीर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य बंडू जपकर, बाबासाहेब होळकर, तसेच गावातील विविध मान्यवर, नाले हैदर यंग पार्टी, दोस्ती तरुण मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाले हैदर यंग पार्टी व दोस्ती तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

