धर्मवार्ता | ५.३ | संतोष बनकर
(Religion) इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, असे म्हटले जाते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या काळात त्यांच्या विचारांची धास्ती घेतलेल्या प्रवृत्तींनी त्यांची ‘गाथा’ इंद्रायणीच्या डोहात बुडवून त्यांचे अस्तित्व पुसण्याचा प्रयत्न केला होता. आज शतकांनंतर, एका हिंदुत्ववादी महाराजाने तुकोबांचे कर्तृत्वच नाकारून त्याच संकुचित मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. पण त्यांना हे ठाऊक नाही की, तुकोबांचे विचार कागदावर नाही, तर या मातीच्या काळजात कोरलेले आहेत.
(Religion) ज्यावेळी तुकोबांची गाथा पाण्यात बुडवण्यात आली, तेव्हा त्या प्रवृत्तींना वाटले होते की विचार संपला. पण तुकोबांचे अभंग हे केवळ कागदावरच्या ओळी नव्हत्या; ते इथल्या सामान्य माणसाच्या नसांनसात भिनले होते. अनुयायांच्या मुखोद्गत असलेल्या त्या अभंगांनी तुकोबांना पुन्हा जिवंत केले. आजही तेच घडत आहे. तुकोबांच्या अभंगांमध्ये छेडछाड झाली, त्यांचे अर्थ बदलण्याचे प्रयत्न झाले, पण लोकांच्या जिभेवर असलेले ‘खरे’ तुकोबा कधीच पुसले गेले नाहीत.
(Religion) तुकोबांचे विचार हे सडेतोड आणि तर्कनिष्ठ आहेत. ते कोणत्याही विशिष्ट चौकटीत किंवा विचारधारेत (विशेषतः हिंदुत्ववादी चौकटीत) फिट बसत नाहीत. जेव्हा एखाद्या महापुरुषाला स्वतःच्या फायद्यासाठी वापरता येत नाही, तेव्हा त्याचे महत्त्वच कमी करणे किंवा त्याचे अस्तित्वच नाकारणे, हा सर्वात सोपा मार्ग असतो. या महाराजाने नेमकी हीच खेळी खेळली आहे. पण तुकोबांचे कार्य हे कोणाच्या प्रमाणपत्रावर अवलंबून नाही.
तुकोबांनी आयुष्यभर ढोंगीपणा आणि दांभिकतेवर प्रहार केला. आज जे लोक त्यांचे कर्तृत्व नाकारत आहेत, ते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे तुकोबांच्या त्या प्रहाराला घाबरत आहेत. तुकोबांचे अभंग केवळ भक्ती शिकवत नाहीत, तर ते अशा खोट्या गोष्टींचा बुरखा फाडण्याची ताकद देतात.
”मऊ मेणाहुनी आम्ही विष्णूदास । कठीण वज्रास भेदू आम्हीं ॥” हा बाणा बाळगणाऱ्या समाजासमोर तुमचे हे नाकारण्याचे प्रयत्न कधीच यशस्वी होणार नाहीत.
या महाराजाचे वक्तव्य हे केवळ एका व्यक्तीचे मत नसून, ती एक विशिष्ट मानसिकता आहे जिला सत्याची भीती वाटते. इंद्रायणीचे पाणी गाथा नष्ट करू शकले नाही, कारण ती लोकांच्या मनात होती. तसंच, तुमची वक्तव्ये तुकोबांचे वलय कमी करू शकणार नाहीत, कारण तुकोबा हे या संस्कृतीचे अविभाज्य अंग आहेत. ज्यांना तुकोबा समजले नाहीत, त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर बोलणे म्हणजे स्वतःचे हसे करून घेण्यासारखे आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.
