Pune news | अलौकिक कर्तृत्वामुळे व्यक्ती लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरते- प्रा. दिगंबर ढोकले; मधुश्री व्याख्यानमाला – द्वितीय पुष्प

उपसंपादक | दिपक शिरसाठ
सत्यमेव जयते

पिंपरी | ४ जून | प्रदीप गांधलीकर

(Pune news) ‘कार्यक्षेत्र कोणतेही असले तरी अलौकिक कर्तृत्वामुळे व्यक्ती लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व ठरते!’ असे प्रतिपादन प्रा. दिगंबर ढोकले यांनी अरविंद – वृंदा सभागृह, स्वर्गीय दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था, पेठ क्रमांक २७, निगडी प्राधिकरण येथे मंगळवारी ता. ०३ जून रोजी केले. मधुश्री कला आविष्कार आणि दत्तोपंत म्हसकर सार्वजनिक विश्वस्त संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय मधुश्री व्याख्यानमालेत ‘लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना प्रा. दिगंबर ढोकले बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे अध्यक्षस्थानी होते; तसेच माजी नगरसेविका शर्मिला बाबर, मधुश्रीच्या अध्यक्षा माधुरी ओक, कार्याध्यक्ष सलीम शिकलगार यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.

Pune news

(Pune new) सलीम शिकलगार यांनी प्रास्ताविकातून, ‘सातत्याने पंधरा वर्षे व्याख्यानमालेसारखा उपक्रम चालविणे हे कठीण व्रत आहे. अर्थातच एखादी गोष्ट नि:स्वार्थ भावनेतून केली तर सर्व स्तरांवर त्याला उत्तम प्रतिसाद मिळतो, हा अनुभव आता घेत आहोत!’ अशी भावना व्यक्त केली. शर्मिला बाबर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. राजेंद्र घावटे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘पिंपरी – चिंचवड या औद्योगिकनगरीचे सांस्कृतिकनगरीत रूपांतर करण्यात व्याख्यानमालांचे मोठे योगदान आहे. प्रसारमाध्यमांचे आक्रमण वाढलेले असताना व्याख्यानांचे महत्त्व अजूनही अबाधित आहे!’ असे मत मांडले.

Pune news

(Pune news) प्रा. ढोकले पुढे म्हणाले, ‘पौराणिक काळापासून आजपर्यंत सर्व क्षेत्रांत असंख्य कर्तृत्ववान व्यक्ती होऊन गेल्या आहेत. ज्या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाचे नुसते स्मरण केल्यावर ‘हे तर लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व!’ असे गौरवोद्गार सहजच आपल्या ओठांवर येतात त्यांचेच कार्य काळाच्या पटलावर कोरलेले असते. महाभारतातील शुकमुनी, वेदान्ताचे अभ्यासक वाचस्पती मिश्रा या पौराणिक काळातील आगळ्यावेगळ्या प्रभृती आहेत. संत मांदियाळीतील निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वरमाउली, मुक्ताबाई, एकनाथमहाराज, तुकोबाराय, जनाबाई, चोखामेळा, सावता माळी, नामदेवराय यांचे मानवजातीवर अनंत उपकार आहेत. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्यासारखा चारित्र्यसंपन्न राजा आणि छत्रपती संभाजीमहाराज यांच्यासारखा धर्मनिष्ठ राजा पुन्हा होणे नाही. स्वामी विवेकानंद यांची मातृभक्ती अद्वितीय होती; तर अब्राहम लिंकन यांची विनम्रता कमालीची होती. अहिल्यादेवी होळकर यांचा भक्तिभाव उच्च कोटीतला होता. महात्मा गांधी, सुभाषबाबू, चापेकरबंधू, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारखे देशभक्त आणि क्रांतिकारक यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची दूरदृष्टी, अण्णा हजारे आणि पोपटराव पवार यांचे सामाजिक कार्य, डॉ. जयंत नारळीकर यांची विज्ञाननिष्ठा, अरुणिमा सिन्हा यांचे धैर्य, कॅप्टन विक्रम बात्रा ते ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहभागी झालेल्या नवविवाहित जवानाचे शौर्य अलौकिक, अविस्मरणीय आहे म्हणूनच ही सर्व व्यक्तिमत्त्वं लाखात आदर्श व्यक्तिमत्त्व आहेत!’ अतिशय ओघवत्या वक्तृत्वशैलीतून प्रा. ढोकले यांनी संतवचने, श्लोक, सुभाषिते, काव्यपंक्ती, विनोद, किस्से उद्धृत करीत विषयाची मांडणी केली. ‘मानवी कल्याणासाठी आपल्याला जे शक्य असेल ते समाजाला द्यायला शिका म्हणजे लाखात एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून इतिहासात नोंद घेतली जाईल!’ असे आवाहन प्रा. ढोकले यांनी केले.

 

अजित देशपांडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. राज अहेरराव, राजेंद्र बाबर, मिलिंद कुलकर्णी, सुनील देशपांडे, रजनी अहेरराव, मनीषा मुळे, पी.बी. शिंदे यांनी संयोजनात सहकार्य केले. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले. चंद्रकांत शेडगे यांनी आभार मानले.

हे ही वाचा : atheism | नास्तिकता : एक सुदृढ जीवनशैली – टी.एन.परदेशी

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *