(Public issue) बेळगाव शहरातील विकासकामांचे हाल नागरिकांना वारंवार त्रासदायक ठरत आहेत. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेली स्मार्ट सिटीतील कामे अद्यापही अपूर्ण असून, शहरातील अनेक भागातील प्रलंबित कामांमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. शहापूर स्मशानभूमीतील निवाऱ्याचे अपूर्ण काम त्याचेच एक ज्वलंत उदाहरण ठरत आहे.
(Public issue) गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहापूर स्मशानभूमीतील निवाऱ्यांवरील पत्रे धोकादायक अवस्थेत पोहोचले होते. यामधील एका निवाऱ्याचे काम सुरू करण्यात आले असले तरी ते पूर्ण होण्यासाठी तीन महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. अवघ्या निवाऱ्याचे काम पूर्ण झाले असले तरी शेगडी आणि चौथऱ्याचे काम अद्यापही प्रलंबित आहे. या कामासाठी तब्बल ३१ लाख ७० हजार रुपयांचा निधी मंजूर असून, ठेकेदाराला दीड महिन्यांत काम पूर्ण करण्याची मुदत होती. मात्र काम रखडल्याने नागरिकांना भर पावसात अंत्यविधी उरकण्याची वेळ आली. त्यामुळे नागरिकांमधे संताप दिसून येत आहे.
(Public issue) दरम्यान, नव्याने उभारण्यात आलेल्या निवाऱ्याच्या शेजारी असलेल्या धोकादायक निवाऱ्यावर झाड कोसळल्याने संपूर्ण निवास कोसळला. त्यामुळे एका निवाऱ्याखालील चार शेगड्यांवरच अंत्यविधी केले जात आहेत. वडगाव स्मशानभूमीत लाकडांचा तुटवडा असल्याने वडगाव परिसरातील नागरिकही शहापूर स्मशानभूमीकडे येत आहेत. सध्या दररोज चार ते सहा अंत्यविधी होतात आणि निवाऱ्याअभावी काहींना पावसात उघड्यावर अंत्यविधी करावा लागत आहे.
निवाऱ्याचे काम सुरू होण्यासाठी निधी मंजूर झाला असून, महापौर मंगेश पवार यांनी त्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. तरीदेखील प्रत्यक्षात काम सुरू नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अंत्यविधीसाठी लाकडांची मोठ्या प्रमाणावर गरज भासत असल्याने आर्थिक भारही वाढत आहे. त्यामुळे नागरिकांना रक्षा गोळा करण्याचे आवाहनही केले जात आहे.
शहरातील अत्यंत संवेदनशील असलेल्या स्मशानभूमीतील विकासकामांना वेळेत पूर्णत्व यावे, कोसळलेल्या जागी नव्याने निवारा उभारण्यात यावा आणि नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे.