Sports | इंग्लंडचा धडाका; श्रीलंकेवर ५१ धावांनी ऐतिहासिक विजय

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २२.२ | गुरुदत्त वाकदेकर

(Sports) आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मधील सुपर-८ टप्प्यात इंग्लंडने श्रीलंकेचा ५१ धावांनी पराभव करत स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अधिक वेगवान केली. पालेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात इंग्लंडने दमदार फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि तडफदार क्षेत्ररक्षणाच्या जोरावर एकतर्फी वर्चस्व गाजवत गट २ मधील अव्वल स्थानावर आपली मोहोर उमटवली.

(Sports) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडने २० षटकांत ९ बाद १४६ धावा उभारल्या. प्रारंभी धक्के बसल्यानंतर फिल सॉल्ट याने ४० चेंडूत ६२ धावांची झंझावाती खेळी करत डावाला सावरले. त्याला विल जॅक्स याने अवघ्या १४ चेंडूत २१ धावांची आक्रमक साथ देत धावसंख्या भक्कम केली.

१४७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर १६.४ षटकांतच अवघ्या ९५ धावांत कोसळला.

(Sports) विल जॅक्स याने अष्टपैलू कामगिरी करत ४ षटकांत २२ धावांत ३ बळी घेत सामन्याची दिशा पूर्णतः बदलली. जोफ्रा आर्चर याने वेगवान माऱ्याने २ बळी घेत श्रीलंकेच्या फलंदाजीची सुरुवातीलाच वाताहत केली. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करत फलंदाजांना खेळण्याची संधीच दिली नाही.
श्रीलंकेकडून कर्णधार दसुन शनाका याने सर्वाधिक ३० धावांची झुंज दिली. मात्र, अन्य फलंदाज अपयशी ठरल्याने संघ मोठ्या धावफटक्यापासून वाचू शकला नाही.
या सामन्यात अनेक विक्रमांची नोंद झाली. इंग्लंडने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेविरुद्ध सलग १२ वा विजय नोंदवत दोन्ही संघांतील सर्वांत दीर्घ विजयमालिका आपल्या नावावर केली. तसेच विश्वचषक स्पर्धेत श्रीलंकेचा डाव १०० धावांच्या आत गुंडाळण्याची इंग्लंडची ही पहिलीच कामगिरी ठरली. विल जॅक्स याने २० पेक्षा कमी चेंडूत २० पेक्षा अधिक धावा करत ३ बळी घेण्याचा दुर्मिळ अष्टपैलू पराक्रम साकारला. इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांनी मिळून ७ बळी घेत सामूहिक फिरकी यशाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला.
या दणदणीत विजयासह इंग्लंडने गट २ मधील अव्वल स्थान पक्के केले असून श्रीलंका गुणतालिकेच्या तळाशी फेकली गेली आहे. संघातील संतुलन, अचूक रणनीती आणि प्रखर आत्मविश्वास यांच्या जोरावर इंग्लंडने यंदाच्या विश्वचषकातील विजेतेपदाचा प्रमुख दावेदार म्हणून आपली ओळख अधिक ठळकपणे अधोरेखित केली आहे.

Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading