स्मृतिवार्ता | ५.४ | रयत समाचार
(Press) माझ्या पत्रकारितेचा श्रीगणेशा दैनिक लोकमतमधून झाला. संभाजीनगरला बी.जे. करत असतानाच लोकमतमध्ये शिकाऊ उपसंपादक म्हणून माझी निवड झाली. बाबा दळवींकडे अग्रलेखाचं डिक्टेशन घेणं, पुरवणीसाठी लेख लिहिणं, पीटीआय आणि युएनआयवरील बातम्यांचा अनुवाद करणं, सिटी रिपोर्टिंगपासून पानं लावणं, अशी विविध कामं मला लोकमतमध्येच शिकता आली, अशी आठवण अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे एस.एम. देशमुख यांनी लिहली.
(Press) देशमुख यांनी पुढे लिहले, इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतरची परिस्थिती कव्हर करताना केलेलं रिपोर्टिंग, तसेच ‘झुमरू’ खून खटल्याच्या न्यायालयीन कामकाजाचं महिनाभर केलेलं वृत्तांकन, या आठवणी आजही ताज्याच आहेत. तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं. त्यामुळे लोकमत हेच आमचं घर, कुटुंब आणि सारं काही होतं. सकाळी ९ वाजता बाबा आमचा ‘क्लास’ घ्यायचे, आणि रात्री शहर आवृत्तीचा अंक छापून झाल्यावरच आम्ही बाहेर पडायचो. सादिया टॉकीजच्या मागे माझी एक छोटी खोली होती, अंग टाकण्यासाठीच आम्ही तिथे जायचो. लोकमत परिवारात आम्ही शेवटच्या पायरीवर होतो, पण तेव्हा लोकमतच आमचं विश्व होतं. “आम्ही लोकमतला आहोत” असं सांगताना छाती अभिमानाने फुगून यायची… खरोखरच, ते दिवस मस्त होते.
(Press) मात्र हे सगळं जेमतेम वर्षभरच चाललं. तरुण वय, नव्या संधी स्वीकारण्याची उर्मी, आणि त्यातच पुण्याचं आकर्षण. एक दिवस “पुणे तरुण भारतमध्ये उपसंपादक पाहिजेत” अशी जाहिरात वाचली आणि लगेच अर्ज केला. बी.जे.चं शिक्षण आणि लोकमतचा अनुभव, या जोरावर माझी निवड झालीच. मी लोकमतचा राजीनामा दिला आणि थेट पुण्याला गेलो.
ही घटना १९८५ सालची… आणि आता त्याला तब्बल ४० वर्षे झाली !
लोकमत सोडल्यानंतर पुन्हा तिथे जाण्याचं काही कारणच उरलं नव्हतं. पण परवा अचानक लोकमतमध्ये जाण्याचा योग आला. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं ४४वं राष्ट्रीय अधिवेशन १८ आणि १९ एप्रिल रोजी उदगीर येथे होत आहे. अधिवेशन पत्रकारांचं असल्यामुळे उद्घाटनही पत्रकारांच्या हस्तेच व्हावं, हा आमचा आग्रह असतो. यापूर्वी पी. साईनाथ, कुमार केतकर यांसारख्या दिग्गजांनी उद्घाटन केलं आहे.
यावेळी लोकमतचे मुख्य संपादक राजेंद्र बाबू दर्डा यांच्या हस्ते उद्घाटन व्हावं, असं आम्ही ठरवलं. ते केवळ लोकमतचे मालक नाहीत, तर स्वतः एक सक्षम आणि निर्भीड लेखक पत्रकार आहेत. त्यांच्या प्रवासवर्णनांनी लोकप्रियता मिळवली आहे, आणि त्यांच्या प्रासंगिक लेखांमध्येही स्पष्ट, सडेतोड भूमिका दिसून येते. कोणाला काय वाटेल याची पर्वा न करता ते लिहितात, हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं वैशिष्ट्य आहे.
या निमित्ताने मी, आमचे विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडिया विंगचे प्रमुख अनिल वाघमारे आणि जितेंद्र शिरसाट, आम्ही लोकमतमध्ये गेलो होतो.
४० वर्षांनी मी त्या वास्तूत पुन्हा पाऊल ठेवत होतो, जिथून माझ्या पत्रकारितेची सुरुवात झाली होती. लोकमतचा अंक जसा बदलला, तशीच ती वास्तूही पूर्णपणे बदललेली दिसली.
पूर्वी राजेंद्र बाबूंची केबिन मध्यवर्ती होती. त्यांच्या पाठीमागे मशिन विभाग, उजवीकडे व्यवस्थापन विभाग आणि डावीकडे संपादकीय विभाग असायचा. काचेच्या केबिनमधून त्यांना संपूर्ण ऑफिस दिसायचं. आता ही रचना बदललेली आहे, जिथे मशिन होती, तिथे आज संपादकीय विभाग आहे. केबिन तिथेच असली तरी तिच्यातही अनेक बदल झाले आहेत.
हे सगळे बदल स्वतः राजेंद्र बाबूंनी बाहेर येऊन मला दाखवले. त्यांच्याशी जवळपास ५० मिनिटं चर्चा झाली आणि त्या चर्चेत ४० वर्षांपूर्वीच्या असंख्य आठवणींना उजाळा मिळाला. विशेष म्हणजे, त्यांनी माझ्या सहकाऱ्यांची नावं अगदी सहजपणे सांगितली, त्यांची स्मरणशक्ती खरोखरच विलक्षण आहे!
लोकमतमधून गेलेल्या अनेकांनी पुढे मोठी पदं गाठली. कोणी संपादक झाले, तर कोणी माहिती खात्यात अधिकारी. हे सगळं ते अभिमानाने सांगत होते. “आपल्याकडून गेलेली माणसं पुढे मोठी झाली,” याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
लोकमत उभं करण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट मी स्वतः पाहिले आहेत. त्यांना हे ठाऊक होतं की, संस्थेचं यश हे कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतं. कदाचित म्हणूनच, मी अचानक लोकमत सोडून गेलो याची खंत त्यांनी आजही व्यक्त केली.
खरं तर, मी त्यावेळी अगदी खालच्या पातळीवर होतो. माझं असणं-नसणं लोकमतसाठी फारसं महत्त्वाचं नव्हतं. पण तरीही “आपला माणूस निघून जातोय” याची जाणीव आणि त्यातून वाटलेली खंत, हेच लोकमतच्या यशाचं गमक आहे, असं मला वाटतं.
लोकमतमधले माझे अनेक मित्र तिथेच रुजले आणि तिथूनच निवृत्त झाले. याचा अर्थ एकच, लोकमतने माणसं जपली, जोडली!
राजेंद्रबाबूंनी अधिवेशनाचं निमंत्रण स्वीकारलं आणि आमचं अतिशय आपुलकीने स्वागत केलं. त्यांनी स्वतः बाहेर येऊन संपादकीय विभाग दाखवला, सहकाऱ्यांची ओळख करून दिली. संपादक मित्रवर्य नंदकिशोर पाटील यांचीही भेट झाली.
खरंच, कालचा दिवस खास होता, अगदी माहेरी आल्यासारखं वाटलं! राजेंद्रबाबू मनापासून आभार.



