बारामती | २.३ | रयत समाचार
(Politics) येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालय तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांचे नामकरण स्व. अजित (दादा) पवार यांच्या नावाने करण्याचा शासननिर्णय प्रसिध्द करण्यात आला आहे. आज ता. २ मार्च २०२६ रोजी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाकडून यासंदर्भातील अधिकृत शासननिर्णय (जीआर) प्रसिद्ध करण्यात आला.
(Politics) नव्या आदेशानुसार, शासकीय वैद्यकीय रुग्णालय, बारामती याचे नामकरण ‘स्व. अजित (दादा) पवार सर्वोपचार रुग्णालय, बारामती’ असे करण्यात येणार आहे. तसेच शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती यास ‘स्व. अजित (दादा) पवार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय, बारामती’ असे नाव देण्यात येणार आहे. शासननिर्णयात नमूद केल्याप्रमाणे, नामांतरानंतर संकेतस्थळ, अधिकृत अभिलेख, नोंदवही, फलक व इतर प्रशासकीय कागदपत्रांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची जबाबदारी संबंधित विभागावर सोपविण्यात आली आहे.
(Politics) अहिल्याबाई होळकर यांचे नाव रद्द : ३१ मे २०२३ रोजी या संस्थेचे नामकरण ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बारामती’ असे करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र नव्या शासन आदेशामुळे त्या निर्णयात बदल करण्यात आला आहे.
बारामती येथील शासकीय वैद्यकीय व आयुर्वेद महाविद्यालय ग्रामीण व अर्धनगरी भागातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आरोग्य केंद्र ठरले आहे. येथे सर्वोपचार सेवा, आपत्कालीन सुविधा तसेच आयुर्वेद उपचार उपलब्ध आहेत. नव्या नामकरणामुळे या संस्थेची ओळख अधिक व्यापक होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
