अहमदनगर | २५ जून | प्रतिनिधी
(Dirty Politics) सार्वजनिक कार्यक्रमात जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविषयी अत्यंत चिथावणीखोर, अपमानास्पद आणि हिंसाचारास प्रवृत्त करणारे वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप ख्रिश्चन समाजाकडून करण्यात आला आहे. त्यांनी सांगलीत केलेल्या विधानामध्ये “ख्रिश्चन धर्मगुरूंना ठार मारणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस” देण्याची खुलेआम घोषणा केली असल्याचे सांगण्यात येत आहे.
(Dirty Politics) या प्रकारामुळे ख्रिश्चन समाजात तीव्र संताप व्यक्त होत असून, या वक्तव्यामुळे राज्यभरात ख्रिश्चन धर्मगुरू आणि समुदायामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सामाजिक सलोखा आणि संविधानातील सहअस्तित्वाचे तत्त्व धोक्यात आले असल्याचे मत ख्रिश्चन समाजाने व्यक्त केले आहे.
(Dirty Politics) या पार्श्वभूमीवर ता.२५ जून रोजी दुपारी ३ वाजता बिशप हाऊस, तारकपूर येथे ख्रिश्चन समाजाच्या विविध चर्च, संस्था, धर्मगुरू आणि प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत ता. २६ जून रोजी सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना कारवाईबाबत निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला.
बैठकीची सुरुवात रेव्ह. ॲड. डी.बी. कसोटे यांच्या प्रार्थनेने झाली. त्यानंतर रेव्ह. जे.आर. वाघमारे यांनी बायबलमधील मत्तय ५:०१-१२ शास्त्रपाठाचे वाचन केले. रेव्ह. सतीश तोरणे यांनी सभेची प्रस्तावना मांडत गोपीचंद पडळकर यांच्या विधानाचा निषेध केला. त्यानंतर रेव्ह. जे.आर. वाघमारे यांनी निवेदनाचे वाचन केले. या निवेदनावर चर्चेसाठी अनेक मान्यवर उपस्थित होते.
या चर्चेत सामाजिक कार्यकर्त्या नलिनी गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार सोलोमान गायकवाड, सरोज आल्हाट, संजीव काकडे, प्रतीक बारसे, मयूर पाटोळे, बाळू पाडळे, विजय काकडे, रेव्ह. सनी मिसाळ, रेव्ह. मार्टिन पारधे, पास्टर जोसेफ वैरागर, रेव्ह. प्रकाश बनसोडे, सुनीत ढगे, सतीश मिसाळ, अनिल सगळगिले, निर्मलाताई केदारी, शैलाताई कांबळे, राहुल पाटोळे, पास्टर गोर्डे, प्रसना शिंदे, निलेश बनसोडे, शाम वैरागर, सत्यशील शिंदे, समुएल बोर्डे आदींची उपस्थिती लक्षणीय होती.
सभेच्या अखेरीस रेव्ह. डी.डी. सोनावणे यांनी प्रार्थना केली व रेव्ह. सतीश तोरणे यांनी आशीर्वाद दिला. आज सकाळी ११:३० वाजता बिशप हाऊस येथून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनासाठी एकत्रित जाण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना करण्यात आले.
ख्रिश्चन समाजाची मागणी : आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात तात्काळ FIR दाखल करावी. भारतीय दंड विधानाअंतर्गत कठोर कारवाई करावी. धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या विधानामुळे आमदारकी रद्द करावी.
ख्रिश्चन समाजाच्या या सामूहिक कृतीने धार्मिक सौहार्द राखण्याबाबतची जबाबदारी अधोरेखित होत असून, शासनाकडून सामाजिक न्याय दिनी याकडे गांभीर्याने पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

