मुंबई | १८ सप्टेंबर | रयत समाचार
राज्यातील सर्व रुग्णालयांतील आरोग्यसेवा सुरळीत राहावी यासाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी डॉक्टरांना संप मागे घेण्याचे आवाहन केले आहे. रुग्णहित हाच सर्वोच्च धर्म असून, डॉक्टरांच्या संघटनांनी नेहमीच रुग्णहिताला प्राधान्य दिले आहे. तीच परंपरा कायम ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मुश्रीफ म्हणाले, संपामुळे ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवा विस्कळीत होऊन सर्वसामान्य रुग्णांना गंभीर अडचणींना सामोरे जावे लागते. आपत्कालीन सेवा खंडित झाल्यास जीवितहानीचा धोका वाढतो. त्यामुळे संप मागे घेऊन चर्चा व संवादातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारने आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (CCMP) संदर्भात घेतलेला निर्णय न्यायालयीन प्रक्रियेत असून अंतिम निर्णय येईपर्यंत स्वतंत्र नोंदणी पुस्तक ठेवण्याबाबत राज्य सरकार भूमिका स्पष्ट करणार नाही, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे संपाच्या निर्णयाने रुग्णसेवा धोक्यात न आणता, न्यायालयाचा निकाल येईपर्यंत प्रतीक्षा करावी, असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले.
सर्व आरोग्यसेवा सुरळीत राहणे हेच सर्वांचे प्राधान्य असावे, असे सांगत रुग्णहितासाठी डॉक्टरांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.