Cultural Politics | ‘मराठी अभ्यास केंद्रा’चे भाषा पुरस्कार जाहीर; 1 मार्चला शाहू सभागृहात वितरण

विज्ञान, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव

SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | २७.२ | रयत समाचार

(Cultural Politics) मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय व दीर्घकालीन योगदान देणाऱ्या चार मान्यवरांना ‘मराठी अभ्यास केंद्र’तर्फे २०२४ सालचे भाषा पुरस्कार जाहीर झाले आहेत. ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अनंत पांडुरंग देशपांडे, प्रयोगशील शिक्षिका मधुरा राजवंशी, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे आणि आदर्श राज्य शिक्षिका छाया चंद्रकांत गाडे यांची यंदाच्या पुरस्कारांसाठी निवड करण्यात आली आहे.

(Cultural Politics)  या पुरस्कारांचे वितरण रविवारी ता. १ मार्च रोजी सकाळी १० वाजता दादर येथील शिवाजी मंदिरातील शाहू सभागृहात होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम व मानपत्र असे असून मराठी भाषा संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही महत्त्वाची परंपरा मानली जाते.

(Cultural Politics)  विज्ञान मातृभाषेतून रुजवणारे – अनंत देशपांडे : ‘अधिवक्ता शांताराम दातार आणि रविंद्र सुर्वे मराठी भाषा आग्रही पुरस्कार’ ज्येष्ठ विज्ञान प्रसारक अनंत पांडुरंग देशपांडे यांना जाहीर झाला आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील दीर्घ सेवेनंतर त्यांनी मराठीतून विज्ञान प्रसारासाठी अनेक दशके कार्य केले. विज्ञानाच्या संकल्पना मातृभाषेतून विद्यार्थ्यांना अधिक स्पष्टपणे समजतात, या विचारातून त्यांनी हजारो लेख, शेकडो व्याख्याने, आकाशवाणी-दूरदर्शन कार्यक्रम आणि अनेक पुस्तके साकारली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी विज्ञान प्रसाराचे सातत्यपूर्ण कार्य केले आहे.
प्रयोगशील शिक्षणाची दिशा – मधुरा राजवंशी : ‘जयवंत चुनेकर प्रयोगशील मराठी शिक्षक पुरस्कार’ मधुरा राजवंशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. फलटण येथील कमला निंबकर बालभवनमध्ये त्या गेली १५ वर्षे इंग्रजी व लैंगिकता शिक्षण विषय शिकवतात. टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून प्राथमिक शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या राजवंशी यांना २०२३-२४ मध्ये ‘फुलब्राइट डिस्टिंग्विश्ड अवॉर्ड्स इन टीचिंग’ ही आंतरराष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली. ग्रामीण मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी शिक्षण अधिक सर्जनशील आणि जीवनाभिमुख करण्यासाठी त्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
मराठी पत्रकारितेतील ठसा – राजेंद्र साठे : ‘दिनू रणदिवे मराठीस्नेही माध्यमकर्मी पुरस्कार’ ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र साठे यांना जाहीर झाला आहे. गेली ३६ वर्षे त्यांनी वृत्तपत्र, दूरदर्शन आणि डिजिटल माध्यमांत संपादक व विश्लेषक म्हणून काम केले. ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘महाराष्ट्र टाइम्स’पासून ते इटीव्ही मराठी व इटीव्ही भारतपर्यंत विविध माध्यमांत त्यांनी नेतृत्व केले आहे. संपादकीय लेखन, राजकीय विश्लेषण आणि नव्या पत्रकारांना घडविण्यात त्यांचे योगदान लक्षणीय आहे.
आदर्श शिक्षक कार्याचा गौरव – छाया गाडे : ‘अशोक नाना चुरी आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ छाया चंद्रकांत गाडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी विश्रांतवाडी मिल्ट्री स्कूल, अहिल्यादेवी शाळा तसेच मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात तब्बल ३७ वर्षे सेवा बजावली; त्यापैकी सहा वर्षे मुख्याध्यापिका म्हणून कार्य केले. विद्यार्थीप्रिय, उपक्रमशील आणि मातृभाषा शिक्षणाबाबत जागरूक शिक्षिका म्हणून त्यांची ओळख आहे. निवृत्तीनंतरही त्या मराठी बालवाडी, अभ्यासवर्ग व पालकशाळा उपक्रमांत सक्रिय आहेत.
मराठी भाषा, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रात सातत्याने परिणामकारक काम करणाऱ्या या मान्यवरांचा सन्मान करून ‘मराठी अभ्यास केंद्र’ त्यांच्या कार्याला अभिवादन करणार आहे. मराठीच्या जतन, संवर्धनासाठी कार्यरत असणाऱ्यांसाठी हे पुरस्कार प्रेरणादायी ठरत आहेत.

हे ही वाचा : India news | कहाणी गंगाबाईंच्या ‘मिथिला व मैथिल राजवंशाचा इतिहास’ पुस्तकाची; भैरवनाथ वाकळे संपादित ‘इसमाद प्रकाशन’चे पहिले मराठी पुस्तक

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading