मुंबई | रयत समाचार
नगरपालिका निवडणुकीत राज्यात सर्वाधिक मताधिक्याची नोंद करत संगमनेर नगराध्यक्षपदी डॉ. मैथिली सत्यजित तांबे यांचा तब्बल १६,६४४ मतांनी दणदणीत विजय झाला. त्या All India Forward Block (एआयएफबी) या नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवार होत्या. एआयएफबीच्या ‘सिंह’ या निवडणूक चिन्हावर त्या विजयी ठरल्या.
या निवडणुकीत एआयएफबी आणि शहर विकास आघाडीने अभूतपूर्व यश मिळवत ३० पैकी २७ नगरसेवक निवडून आणले. सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखालील या आघाडीने पहिल्याच प्रयत्नात राजकीय वर्तुळाला जोरदार धक्का दिला आहे.
विशेष म्हणजे, शिवसेना (शिंदे गट)चे आमदार अमोल खताळ यांच्यासह महायुतीसमोर एआयएफबीने निर्णायक विजय मिळवत संगमनेरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण केले आहे. शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय, पारदर्शक प्रशासन आणि सर्वसमावेशक धोरणांची अपेक्षा नागरिकांनी या निकालातून व्यक्त केली असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
हा विजय केवळ व्यक्तीगत नसून, पर्यायी राजकारणाला मिळालेली ठाम पावती असल्याचे चित्र संगमनेरमध्ये दिसून येत आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या एआयएफबीने निवडणूक जिंकून राज्यात खाते उघडले. एआयएफबीचे राज्य पदाधिकारी कॉम्रेड किशोर कर्डक यांनी आनंद व्यक्त करत दुजोरा दिला.
