मुंबई | ७.६ | रयत समाचार
(Police) भाजपतर्फे २१ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्चाबाबत वरळी पोलिसांनी माहिती अधिकारातून दिलेल्या उत्तरांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मोर्चासाठी पोलिस परवानगी, बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन, प्रसारमाध्यमांना दिलेली माहिती, मोर्चा सुरू व संपल्याची वेळ अशा महत्त्वाच्या बाबींवर “अभिलेखावर उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आल्याने या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे, अशी माहिती मराठीकारण’चे आनंद भंडारे यांनी दिली.
(Police) माहिती अधिकार कार्यकर्ते आनंद भंडारे यांनी या मोर्चासंदर्भात वेगवेगळ्या टप्प्यांवर माहिती मागितली होती. त्यामध्ये मोर्चासाठी परवानगी कोणी मागितली, पोलिसांनी लेखी परवानगी दिली का, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोणती उपाययोजना केली, बंदोबस्तासाठी किती पोलिस तैनात होते, मोर्चा किती वेळ चालला यासह विविध बाबींचा समावेश होता.
(Police) मात्र वरळी पोलिस ठाण्याकडून दिलेल्या उत्तरात या बहुतेक सर्व बाबींवर “माहिती अभिलेखावर उपलब्ध नाही” असे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, मोर्चाच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिस दलाचा तपशील विचारल्यानंतरही “अभिलेखावर उपलब्ध नाही” असे उत्तर देण्यात आले.
यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण मोर्चादरम्यान मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त दिसत होता. मोर्चाचे व्हिडिओ, वृत्तवाहिन्यांवरील दृश्ये आणि घटनास्थळावरील उपस्थिती यामध्ये पोलिसांची सक्रिय भूमिका स्पष्ट दिसत असतानाही त्या बंदोबस्ताची अधिकृत नोंद नसल्याचे उत्तर समोर आले.
याचवेळी आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, मोर्चाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. आयोजकांविरोधात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी संबंधित परवानगी पत्राची प्रत मागितल्यावर ती अभिलेखावर उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
यामुळे आता प्रश्न उपस्थित होत आहे की, जर परवानगीची नोंद उपलब्ध नाही, बंदोबस्ताची माहिती उपलब्ध नाही, वाहतूक व्यवस्थापनाची माहिती उपलब्ध नाही, तर एवढ्या मोठ्या मोर्चाचे अधिकृत व्यवस्थापन नेमके कशाच्या आधारावर करण्यात आले.
या उत्तरांनंतर पोलिस प्रशासनाच्या अभिलेख व्यवस्थापनावर तसेच पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले असून या प्रकरणावर आता अधिक स्पष्टीकरणाची मागणी होत आहे.
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.

