मुंबई | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक police स्टेशनमध्ये जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करावेत असा आदेश पोलीस महासंचालक कार्यालयाने ता.१९ जुलै रोजी काढला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्र पोलिसांच्या या आदेशाचे स्वागत केले आहे.
राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.छेरिंग दोरजे यांच्या सहीने असलेल्या आदेशात म्हटले आहे की, ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा, जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३’ च्या कलम ५ (१) अन्वये, महाराष्ट्र शासनास प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन, महाराष्ट्र शासन, सदर अधिनियमातील कलम ५ (२) मध्ये उद्धृत केलेली कर्तव्ये पार पाडण्याकरीता पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात सहाय्यक आयुक्त (गुन्हे), तसेच पोलीस अधीक्षकांच्या कार्यक्षेत्रात पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा) यांची दक्षता अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्याच्या तसेच, शासन पत्र, गृहविभाग, क्र. अधिनियम ०७५१/प्र.क्र.३२४/विशा-६, दि.१८/०३/२०१६ मध्ये नमुद केल्यानुसार ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अधिनियम २०१३ च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये एक कक्ष स्थापन करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्यांना देत आहे.
पोलीस महासंचालक कार्यालयाकडून हे आदेश सर्व पोलीस आयुक्त, सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पाठवले गेले आहेत.
अंनिसच्या राज्य कार्यकारी समितीने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ऑगस्ट २०१३ मध्ये डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या बलिदानानंतर जादूटोणाविरोधी कायदा राज्यात लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ‘अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष’ स्थापन करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची गेल्या अनेक दिवसांपासूनची एक मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. पोलीस प्रशासनास विनंती आहे की, हे कक्ष स्थापन झाल्यावर त्यांची जिल्हावार माहिती पोलिसांनी जनतेसमोर जाहीर करावी, जेणेकरून पीडित लोक आपली तक्रार निर्भयपणे या कक्षाकडे घेऊन येतील. जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने मागील वर्षी एक राज्यव्यापी जनप्रबोधन यात्रा काढली होती.अंनिसच्या राज्य कार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, नंदिनी जाधव, मुक्ता दाभोलकर, अण्णा कडलास्कर, प्रशांत पोतदार, राहुल थोरात, रामभाऊ डोंगरे, फारुक गवंडी, विनोद वायंगणकर, सम्राट हटकर, मुंजाजी कांबळे, प्रविण देशमुख, डॉ. अशोक कदम, प्रकाश घादगिने यांनी हे पत्रक काढले आहे.
अंनिसच्या समितीच्या राज्य कमिटी सदस्य मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव याबाबत म्हणाल्या की, महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाने राज्याच्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्याचे जे आदेश दिले आहेत त्याबद्दल संघटनेच्या वतीने पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक अभिनंदन. अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्थापन करणे हे महाराष्ट्र पोलिसांचे आश्वासन पाऊल आहे. यामुळे जादूटोणाविरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कक्षातील अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना जादूटोणाविरोधी कायद्याचे मोफत प्रशिक्षण देण्यास तयार आहे.
हे हि वाचा : श्रीगोंद्याचे थोर वारकरी संत : शेख महंमद – टी.एन.परदेशी यांची ‘साहित्यवार्ता’ वाचा
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.