पुणे | रयत समाचार
(Literature) “जीवनात योग्य गुरूची निवड आणि त्या गुरुवरील अढळ विश्वास मनुष्याला नक्कीच यशस्वी बनवतो,” असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि लखनौ विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. बी. निमसे यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. देबेंद्रनाथ मिश्रा यांच्या ६५व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या बहुआयामी कार्यावर आधारित ‘द हार्बिंजर’ (The Harbinger) या गौरवग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
(Literature) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. पी. काणे तसेच पुण्यातील अबेदा इनामदार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शैला बुटवाला यांनी विशेष उपस्थिती दर्शवली. महाराष्ट्रातील विविध नामवंत विद्यापीठांतील आजी-माजी प्राध्यापक, संशोधक, डॉक्टर, साहित्यिक, प्रशासकीय अधिकारी तसेच डॉ. मिश्रा यांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
(Literature) कार्यक्रमाची सुरुवात डॉ. डी. एन. मिश्रा यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपटाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आणि ‘द हार्बिंजर’ (The Harbinger) या गौरवग्रंथाचे औपचारिक प्रकाशन झाले.
डॉ. एस. पी. काणे यांनी डॉ. मिश्रा यांच्या ज्ञान, नेतृत्व आणि संसाधनांचा सदुपयोग करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी त्यांनी केलेल्या कार्याची माहिती दिली. तर प्राचार्या डॉ. शैला बुटवाला यांनी मिश्रा यांच्या व्यक्तिमत्त्वातील विशेष गुणांनी महाविद्यालयाच्या विकासास कसा हातभार लावला, याची उजळणी केली.
“आजचा कार्यक्रम हा शैक्षणिक गुणवत्तेच्या सन्मानाचा आहे,” असे गौरवोद्गार प्रमुख पाहुणे डॉ. एस. एन. पठाण यांनी काढले. ‘द हार्बिंजर’ (The Harbinger) या ग्रंथात विविध विषयांवरील संशोधनपर लेखांसह डॉ. मिश्रा यांच्या शैक्षणिक, संशोधन व प्रशासकीय योगदानाचा व्यापक आढावा घेणारे लेख, आठवणी आणि विद्यार्थी मनोगते समाविष्ट आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नितीन आर. साळवे आणि डॉ. कोमल एस. गोमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. विहंग पाटील यांनी मानले.
हे हि वाचा: Film festival | ‘स्पार्क फिल्म फेस्टिव्हल २०२५’ पर्यावरण विषयी राज्यस्तरीय लघुपट स्पर्धेत सहभागी व्हा; शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरतर्फे आयोजन