Health | जीवनदायी योजनेचा लाभ घ्या; आरोग्य हीच खरी संपत्ती- महापौर ज्योती अमोल गाडे; दंत मुख आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

अहमदनगर | ७.४ | रयत समाचार

(Health) महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक आरोग्य दिनानिमित्त मोफत दंत मुख आरोग्य व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महापौर ज्योती अमोल गाडे यांच्या हस्ते झाले. शहरातील नागरिक, आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

(Health) महापौर गाडे आपल्या मनोगतात म्हणाल्या की, महानगरपालिकेच्या माध्यमातून “जीवनदायी” योजनेअंतर्गत नागरिकांना विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. नगरकरांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. आजच्या आधुनिक व धकाधकीच्या जीवनात नागरिक, विशेषतः महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांचा लाभ घेऊन नियमित तपासणी करून निरोगी राहण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. महापालिका आरोग्य विभागामार्फत शहरात ठिकठिकाणी तपासणी शिबिरांचे आयोजन केले जात असून, या माध्यमातून आजारांचे वेळेवर निदान होऊन डॉक्टरांना योग्य उपचार करणे शक्य होते. त्यामुळे आरोग्य शिबिरे ही आजच्या काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच नागरिकांनी केमिकलयुक्त अन्न टाळून नैसर्गिक व संतुलित आहार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

Health

(Health) कार्यक्रमास आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुक्तेकर, महिला व बालकल्याण समिती सभापती दिपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, उपायुक्त मेहेर लहारे, शहाजहान तडवी, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर, डॉ. आहाद शेख, डॉ. आलिया शेख यांच्यासह आशा सेविका, विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजुरकर यांनी सांगितले, जागतिक आरोग्य दिनानिमित्त आयोजित या शिबिरात आशा सेविका, विद्यार्थी व महापालिका कर्मचाऱ्यांची दंत-मुख तपासणी करण्यात आली. यामध्ये दात, हिरड्या, जिभेचे आजार, एक्स-रे, लॅब तपासणी तसेच हिमोग्लोबिन (एचबी) तपासणी अशा विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. दैनंदिन जीवनात दातांचे आरोग्य चांगले राखणे अत्यंत आवश्यक असून, त्यासाठी नागरिकांनी नियमित काळजी घेणे गरजेचे आहे.

 

Share This Article