Social | अकोलेत ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ विचारांचा जागर; चार दिवसीय व्याख्यानमाला

रयत समाचार वृत्तसेवा
3 Min Read

अकोले | ८.४ | रयत समाचार

(Social) अकोले शहरात वैचारिक आणि सामाजिक चळवळींचा समृद्ध वारसा जपत यंदाही ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ व्याख्यानमालेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ता. ११ ते १४ एप्रिल दरम्यान मान्यवर व्याख्यात्यांच्या उपस्थितीत ही व्याख्यानमाला रंगणार असून विविध विषयांवर समाजप्रबोधनाचा सशक्त संदेश देण्यात येणार असल्याची माहिती रयत समाचारला प्रा. विजय भगत यांनी दिली.

(Social) अधिक माहिती देताना प्रा. भगत म्हणाले, व्याख्यानमालेची सुरुवात ज्येष्ठ पत्रकार आणि रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ‘शेती आणि शेतकऱ्यांसमोरील आव्हाने’ या अत्यंत ज्वलंत विषयावर ते पहिले पुष्प गुंफणार आहेत. ‘दुष्काळ आवडे सर्वांना’ या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकातून त्यांनी शेती, दुष्काळ, गरिबी, शेतकरी आत्महत्या आणि बेरोजगारी यांसारख्या गंभीर प्रश्नांवर प्रकाश टाकला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. बबनराव महाले, तर स्वागताध्यक्ष म्हणून प्रा. बाळासाहेब मेहेत्रे कार्यभार सांभाळणार आहेत.

(Social) ता. १२ एप्रिल रोजी नव्या पिढीतील प्रभावी कवी डॉ. स्वप्नील चौधरी ‘चल दंगल समजून घेऊ’ या विषयावर कवितांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणार आहेत. निसर्ग आणि समाज यांवरील त्यांच्या संवेदनशील अभिव्यक्तीमुळे हे सादरीकरण विशेष ठरणार आहे. या सत्राचे अध्यक्ष ह.भ.प. विवेक महाराज केदार असून स्वागताध्यक्ष डॉ. सखाराम घनकुटे असतील.
व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी ह.भ.प. शामसुंदर सोन्नर महाराज ‘समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आणि आजचा महाराष्ट्र’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे सोन्नर महाराज संविधान समता दिंडीचे संचालक असून समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश देतात. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. संपत महाराज भोर, तर स्वागताध्यक्ष ह.भ.प. डॉ. भाऊराव महाराज उघडे असतील.
ता. १४ एप्रिल रोजी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ‘संघम् शरणम् गच्छामी’ हे त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जाणार आहे. हैदराबादच्या अभ्युदय कला अकादमीच्या २१ कलाकारांचा संच हे नाट्य सादर करणार असून देशभरात ८०० हून अधिक प्रयोग झालेल्या या नाट्यप्रयोगात अभिनेते जग्गाराजू यांनी डॉ. आंबेडकर यांची भूमिका साकारली आहे.
महानाट्यापूर्वी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त छोटेखानी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विजयराव वाकचौरे, तर स्वागताध्यक्ष म्हणून आयाज शेख कार्यभार सांभाळतील. आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.
व्याख्यानमालेच्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन आणि विक्रीसाठी स्टॉल लावण्यात येणार आहे. अकोले तालुक्यातील गायक व्याख्यान सुरू होण्याआधी समतेची गाणी व पथनाट्य सादर करणार आहेत.
अकोले तालुक्यात गेल्या तीन दशकांपासून सुरू असलेली ही व्याख्यानमाला सामाजिक, वैचारिक आणि सांस्कृतिक अभिसरण घडवणारा प्रभावी मंच ठरली आहे. यापूर्वी डॉ. बाबा आढाव, डॉ. कुमार सप्तर्षी, डॉ. नरेंद्र दाभोळकर, मेधा पाटकर, राजू शेट्टी, विश्वास नांगरे पाटील आदी मान्यवरांनी येथे व्याख्याने देऊन या परंपरेला उंची प्राप्त करून दिली.
या चार दिवसीय व्याख्यानमालेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन ‘शिव-फुले-शाहू-आंबेडकर’ विचारधारेचा प्रसार करण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी संयुक्त जयंती महोत्सव समिती, बळीराजा अभ्यास मंडळ, छात्रभारती, राष्ट्र सेवा दल, समता परिषद, इब्टा, साथी अमृतभाई मेहता प्रतिष्ठान, व्यापारी संघटना, केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशन, शिक्षक व प्राध्यापक संघटना यांसह विविध समविचारी संस्था प्रयत्नशील आहेत.

Mithila va Maithila Rajavamshacha Itihasa By Gangabai


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading