पणजी | २९ जानेवारी | प्रतिनिधी
(goa news) कृष्णदास श्यामा ते बा.भ. बोरकर आणि विष्णू वाघ ते सुदेश लोटलीकर अशी अनेक प्रतिभावान कवींची मांदियाळी गोव्याला लाभली आहे. गोमंतकीय कविता चहुअंगाने फुलत असून ती समृद्ध साहित्याचा वारस घेऊन पुढे चालली आहे, असे उद्गार ज्येष्ठ भाष्य कवी रामदास फुटाणे यांनी काढले.
(goa news) इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा आयोजित कुजिरा – बांबोळी येथील धेंपे वाणिज्य महाविद्यालय सभागृहात राष्ट्रीय बहुभाषिक कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून फुटाणे बोलत होते. यावेळी मंचावर आयएमबी अध्यक्ष दशरथ परब, सदस्य सचिव अशोक परब, प्राचार्य मनोज कामत, कवी माधव बोरकर आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना दशरथ परब म्हणाले, भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला होणारे हे बहुभाषिक कवी संमेलन म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचा धागा अधिक घट्ट करणारे आहे. अनेक गोमंतकीय कवी देश पातळीवर चमाकत आहेत. साहित्य अकादमीपासून पद्मश्री पुरस्कारापर्यंतचा लौकिक ते प्राप्त करत आहेत.
या बहुभाषिक कवी संमेलनात देशभरातील एकूण १८ कवींनी सहभाग घेतला. माधव बोरकर, रतिका राणे, दीक्षा हळर्णकर, स्मिता कामत, आशालता नावेलकर, सोनाली सावळ देसाई, निलबा खांडेकर, डॉ. ब्रायन मेंडोसा, चित्रसेन शबाब, सुनिता फडणीस, ग्वादालुप डायस (गोवा), कृष्णा बडीगर, अनुराधा सिंग (कर्नाटक), संतोष कुमार (बिहार), रमण संधू (पंजाब), जमालुद्दीन चिश्ती, अभिजित घुले (महाराष्ट्र) हे कवी व कवयित्री सहभागी होते.
प्राचार्य मनोज कामत यांनी दीप प्रज्वलित करून कवी संमेलनाचे उद्घाटन केले. दशरथ परब यांनी प्रास्तविक केले. विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तथा काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी अशोक परब यांनी सर्वांचे आभार मानले.
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.