Ad imageAd image

FDA | हॉस्पिटलमधून औषधे घेण्याची सक्ती बेकायदेशीर; नियम मोडणारांवर कारवाई; तुकाराम मुंढे यांचा इशारा

हेल्पलाईन 1800 22 2365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा

रयत समाचार वृत्तसेवा
2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १३.६ | रयत समाचार

(FDA) रुग्णालयातील अंतर्गत फार्मसीमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती रुग्णांवर करता येणार नाही, असा स्पष्ट इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) दिला आहे. रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषधे खरेदी करण्याचा कायदेशीर अधिकार असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.

(FDA) अनेक खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना रुग्णालयातील फार्मसीतूनच औषधे घेण्यास भाग पाडले जाते. बाहेरून औषधे आणण्यास मनाई केली जाते किंवा त्यासाठी विविध अडथळे निर्माण केले जातात, अशा तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रुग्णांच्या अधिकारांबाबत स्पष्ट भूमिका मांडली आहे.

काही दिवसांपूर्वी अहिल्यानगरमधील सावेडीगावाशेजारील एका तगड्या हॉस्पिटलने पेशंटच्या गरीब नातेवाईकांनी हॉस्पिटल बाहेरील ‘स्वस्त औषध सेवा’ देणाऱ्या मेडीकलमधून औषधे खरेदी करून आणली तर हॉस्पिटलने ‘पेशंट घेऊन जाण्याचा’ दम दिला. बाहेरच्या औषधांना बंदी आणली. असहाय गरीबांची यामुळे मोठी लूट होत होती.

(FDA) मुंढे यांनी सांगितले की, रुग्णालयातील फार्मसी ही रुग्णांच्या सोयीसाठी असते, सक्ती करण्यासाठी नाही. डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे रुग्णांना कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल स्टोअरमधून खरेदी करता येतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने रुग्णांवर दबाव टाकणे किंवा बाहेरून आणलेल्या औषधांना विनाकारण नकार देणे हे नियमबाह्य ठरू शकते.
अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले की, रुग्णांच्या या अधिकाराचे उल्लंघन करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई केली जाईल. तसेच रुग्णांनी अशा प्रकारच्या सक्तीबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाकडे महाराष्ट्र हेल्पलाईन 1800 22 2365 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
आरोग्यक्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे रुग्णांना औषधांच्या किंमतींची तुलना करून स्वस्त पर्याय निवडण्याची संधी मिळणार असून वैद्यकीय खर्चावरील आर्थिक भार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल.
या निर्देशामुळे राज्यातील लाखो रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना दिलासा मिळाला असून, आरोग्यसेवेत पारदर्शकता आणि रुग्णांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

FDA | ‘गुटखा तस्करां’ना मोक्का लावणार – तुकाराम मुंढे; पत्रकार परिषद व्हिडीओ पहा


Discover more from Rayat Samachar

Subscribe to get the latest posts sent to your email.

Share This Article

Discover more from Rayat Samachar

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading