राहुरी | १६ जून | प्रतिनिधी
(Education) नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राहुरी तालुक्यातील केंदळ बु. (विठ्ठलवाडी) येथील जिल्हा परिषद शाळेत देवी सरस्वतीचे पूजन करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना नवीन गणवेश आणि पुस्तके वाटण्यात आली.
(Education) तनपुरे यांनी विद्यार्थ्यांच्या औक्षणानंतर फुले स्वीकारली व आपल्या भाषणात लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, शाळेच्या पहिल्या दिवशी अनामिक भीती असायची, पण मित्रांना भेटायची उत्सुकता देखील तेवढीच होती. काळानुसार शैक्षणिक पद्धती बदलल्या असून, शिक्षकांनीही आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकवले पाहिजे.
(Education) यावेळी शाळेतील विद्यार्थी गणवेश परिधान करून शिस्तीत उपस्थित होते. तनपुरे यांनी या बालकांना पाहून आशावाद व्यक्त करत म्हटले, हे विद्यार्थीच उद्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारे आधारस्तंभ ठरणार आहेत.
कार्यक्रमास पालक, ग्रामस्थ आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शाळेच्या परिसरात नव्या वर्षाची ऊर्जा आणि उत्साहाने भारलेले वातावरण पाहायला मिळाले.
