भिंगार | १७ फेब्रुवारी | विष्णू उदे
(Education) शिक्षकांच्या शब्दातील ताकद ओळखून त्याचा अंगीकार करावा सोबतच विद्यार्थीदशेत असताना संगती नेहमी चांगली ठेवली पाहिजे असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते गणेश ठोकळ यांनी केले. भिंगार येथील श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूलमधे एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी शुभचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
(Education) कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानदीप विद्यालयाचे माजी प्राचार्य भाऊसाहेब रोहोकले, प्रमुख वक्ते शिवव्याख्याते गणेश ठोकळ, शिक्षक नेते वैभव सांगळे, विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, मुख्याध्यापक नारायण अनभुले, पर्यवेक्षक संपत मुठे आदी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
(Education) प्रास्ताविकामध्ये प्राचार्य प्रमोद तोरणे यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देत चांगली तयारी करून प्रामाणिकपणे परीक्षा देण्याचा संदेश दिला. यावेळी एसएससीच्या विद्यार्थ्यांनी भाषणे केली. त्यांचे अश्रू अनावर झाले, शाळेमध्ये घालवलेले अनेक आंबट-गोड प्रसंग सांगत विद्यार्थ्यांचे शाळेविषयी असणारे प्रेम भाषणाद्वारे व्यक्त केले.
माजी प्राचार्य भाऊसाहेब रोहोकले यांनी परीक्षेला जाताना कशी तयारी करायची यावर विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का बेरड, राजश्री भिंगारदिवे यांनी केले तर आभार पर्यवेक्षक संपत मुठे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इयत्ता नववीच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
हे ही वाचा : Social | नैतिकता : समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक – संजय सोनवणी