परलोकाची चिंता पाश्चात्य जगाने फारशी केलेली दिसत नाही
समाजसंवाद | २४ डिसेंबर | संजय सोनवणी
(Social) नैतिकता ही समाजांतर्गत सुरक्षित जीवन जगण्यासाठी आवश्यक झालेली एक अपरिहार्य बाब. स्त्री-पुरुष संबंध कसे असावेत, एकमेकांत चोरी करावी की नाही. शत्रु असेल तर त्याची चोरी केलेली चालेल की नाही. स्वटोळीअंतर्गत एखाद्याने खून करणे, त्याची संपत्ती लुटणे न्याय्य कि अन्याय्य? न्याय्य असेल तर कोणत्या स्थितीत आणि अन्याय्य असेल तर कोणत्य स्थितीत? जिंकलेल्या गुलामांचे काय करायचे? जिंकलेल्या धनाचे वाटप कसे करायचे? या बाबतीतही नियमन गरजेचेच होते. कारण त्यावरून होणाऱ्या संघर्षात टोळीअंतर्गतही अव्यवस्था माजत होती.
(Social) आद्य नीतितत्वे व त्यातुनच जन्मलेले आदिम कायदे टोळीअंतर्गत संघर्षाने आपली सुरक्षितता धोक्यात येवू नये म्हणून आवश्यक बनून गेली. राज्य व्यवस्थेचा जन्मही नागरिकांना सुरक्षा प्रदान करण्यासाठीच झाला. पण आदिम भयाने माणसाची पाठ कधीच सोडली नाही, कारण नित्याने अनुभवायला येणाऱ्या असुरक्षिततेला त्याला कधीच तोडगा सापडला नाही.
मानवी तत्वज्ञानाचा जन्मच मुळी या अनिश्चिततेची कारणे शोधत त्यावर तात्विक उपाय शोधण्यासाठी झाला.