पाथर्डी | २९ जानेवारी | राजेंद्र देवढे, विशेष प्रतिनिधी
(education) येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात बहि:शाल शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे व बाबुजी आव्हाड महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला संपन्न झाली. डॉ. गोकुळ क्षीरसागर यांनी, सिनेमा क्षेत्रातील करीयरच्या संधी या विषयावर प्रथम पुष्प गुंफले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमास केंद्र कार्यवाह प्रा. दत्तप्रसाद पालवे, डॉ. भगवान सांगळे, डॉ. अशोक डोळस हे मंचावर उपस्थित होते.
(education) यावेळी बोलताना डॉ. क्षीरसागर म्हणाले, सिनेमा हा समजण्यासाठी खूप सोपा आहे. परंतु शिकण्यासाठी खूप अवघड विषय आहे. जगात सर्वात जास्त सिनेमे भारतात बनत असून सिनेमाभोवती खूप मोठे अर्थकारण फिरत असते. सिनेमात स्पॉट बॉय पासून पटकथा लेखक ते कोरिओग्राफीपर्यंत करियरच्या अनेक संधी उपलब्ध असून ग्रामीण भागातील मुलांनाही सिनेमा क्षेत्रातील करियर खुणावत आहे. सोशल मिडीयाच्या वाढत्या वापरामुळे ग्रामीण भागातील मुले रील्स बनवून आपल्या प्रतिभेची चुणूक जगाला दाखवत आहेत. येणाऱ्या काळात या क्षेत्रातील करियरचा ग्रामीण विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. अशोक ढोले यांनी गुंफले. त्यांनी मुलखावेगळी माणसे या विषयावर बोलताना ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा जीवनपट उलगडून दाखवला. ते म्हणाले, बाबा आमटे यांनी १९५२ साली कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची स्थापना केली. तिथंच कुष्ठरोग्यांच्या रोजगाराचीही व्यवस्था केली. अंध, अपंग, लाचार व कर्णबधिर या सगळ्यांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. कुष्ठरोग्यांना मानसिक आधार दिला. कुष्ठरोग्यांना नवा आशेचा किरण दाखविला. पाप केल्याने कुष्ठरोग होतो, अशी समज त्यावेळी होती, जी बाबा आमटे यांनी दूर केली. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. महाराष्ट्राला विकास व उत्कर्षाची झळाळी दिली. त्यांनी समाज व राष्ट्रहिताला प्राधान्य देताना कायम जीवनमुल्यांची जोपासना केली. त्यामुळेच ते आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार ठरतात.
(education) ज्येष्ठ साहित्यिक तथा कवी डॉ. कैलास दौंड, मराठी सामाजिक कविता या विषयावर तिसरे पुष्प गुंफताना म्हणाले, इ.स. १११० साली मराठी कविता अस्तित्वात आली. समाजव्यवस्थेचे चित्रण कवितेतून होते. मराठी कविता ही सामाजिक भावनांचा संगम असून समाज समजून घेण्यासाठी सामाजिक कविता महत्वाच्या असतात. त्यांनी केशवसुतांपासून बा.सी. मर्ढेकर, नारायण सुर्वे, नामदेव ढसाळ आदी कवींच्या काव्यसाधनेचा परामर्श आपल्या व्याख्यानातून घेतला. वर्तन बदल हे शिक्षणाचे प्रमुख ध्येय असून अपूर्णतेची जाणीव माणसाला यशस्वी बनविते असे ते शेवटी म्हणाले.
डॉ. अशोक डोळस यांनी प्रास्ताविक केले तर केंद्र कार्यवाह प्रा. दत्तप्रसाद पालवे यांनी आभार प्रदर्शन केले. तीन दिवसीय व्याख्यानमालेस विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला.
हे ही वाचा : धर्मवार्ता | संन्याशांनी विवाहसोहळ्यात उपस्थित राहण्यास काही शास्त्राधार आहे काय ? टी.एन.परदेशी
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.