Culture | भारतीय संगीताचा शेवटचा स्वर हरपला; राज ठाकरे यांची आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली

2 Min Read
SubEditor | Dipak Shirasath

मुंबई | १२.४ | रयत समाचार

(Culture) ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी अत्यंत भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली. ‘आशाताई म्हणजे भारतीय चित्रपट संगीताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा महत्वाचा घटक होता, असे म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Culture

(Culture) राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये आशाताई आणि लता मंगेशकर यांची तुलना युरोपातील महान कलाकार लिओनार्दोद व्हिन्सी आणि मायकेलेंजोलो यांच्याशी केली. त्यांनी म्हटले, लतादीदींच्या आवाजात परफेक्शन आणि आध्यात्मिक स्थैर्य जाणवतं, तर आशाताईंच्या गाण्यात नजाकत, आवेग, धिटाई आणि बेधडकपणा जाणवतो.

(Culture) आशाताईंच्या कारकिर्दीचा आढावा घेताना त्यांनी सांगितले, अवघ्या १५व्या वर्षी कुटुंबाची जबाबदारी उचलत त्यांनी गाण्याच्या जोरावर आयुष्य उभं केलं. अनेक वैयक्तिक संकटांचा सामना करतानाही त्यांनी आपल्या आवाजातील जिवंतपणा आणि ऊर्जा कधीच कमी होऊ दिली नाही.
राज ठाकरे यांनी त्यांच्या काही अजरामर गाण्यांचाही उल्लेख केला. ‘पिया तू अब तो आजा’ मधील धिटाई, ‘आईये मेहरबान’ मधील लडिवाळपणा, ‘दम मारो दम’ मधील बंडखोरी आणि मराठी भावसंगीतातील अध्यात्मिक गाणी, या सर्वांमधून आशाताईंच्या बहुआयामी प्रतिभेची जाणीव होत राहते, असे त्यांनी नमूद केले.
‘लतादीदी आणि आशाताई यांनी भारतीय संगीताला जो दर्जा दिला, तोच आपल्या भावविश्वाला दिशा देणारा ठरला. त्यांच्या सारख्या कलाकारांमुळेच समाजात सौंदर्य, संवेदनशीलता आणि मूल्यांची जपणूक झाली, असेही ते म्हणाले.
शेवटी, काही वर्षांपूर्वी लतादीदी गेल्या आणि आज आशाताई गेल्या…भारतीय संगीताच्या रेनेसाँस युगाचा शेवटचा स्वर आज हरपला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत आशाताईंना श्रद्धांजली अर्पण केली.

Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा ! – संजीव चांदोरकर

Social | सामाजिक संघर्ष कमी करण्याचे ‘भिवंडी मॉडेल’

Share This Article