सांगली | १० जून | प्रतिनिधी
(Crime) महानगरपालिकेतील उपायुक्त वैभव विजय साबळे याला २४ मजली इमारतीच्या परवान्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकवण्यात आले. ही बाब केवळ लाचखोरीपुरती मर्यादित नाही, तर साबळेने प्रशासनात प्रवेश मिळवतानाच केलेल्या फसवणुकीचीही धक्कादायक माहिती पुढे आली आहे. साबळे याने एमपीएससी परीक्षा देताना स्वतःला कर्णबधीर असल्याचे खोटे वैद्यकीय प्रमाणपत्र वापरले असल्याचे कळते. विशेष म्हणजे, तो ज्या दिवशी जन्मला, त्याच दिवशीच त्याला कर्णबधिरत्वाचे प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली.
(Crime) विजय कुंभार पुढे म्हणाले, पूजा खेडकर प्रकरण बाहेर आल्यानंतरच वैभव साबळेने शोभेच्या श्रवणयंत्राचा वापर सुरू केला. त्याआधी कधीही त्याने ते वापरले नाही. लोकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही यंत्रणेकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, कारण याच यंत्रणेत अनेकांनी अशाच प्रकारे फसवणूक करून नोकऱ्या मिळवल्या आहेत.
(Crime) कुंभार यांनी जोरदार शब्दांत सांगितले, फसवणूक करून आलेले लोक प्रामाणिक काम करूच शकत नाहीत. ते केवळ खुर्चीचा गैरवापर करतात, सामान्य जनतेचा छळ करतात आणि लाच घेतात. अशा बोगस पात्रतेच्या आधारावर व्यवस्थेत शिरलेली मंडळी सडलेल्या व्यवस्थेचे मूळ कारण आहेत.
ते पुढे म्हणाले, ही व्यवस्था आता केवळ कर्णबधीर नव्हे, तर पूर्णतः मूक आणि अंध झाली आहे. तिच्या उद्धारासाठी केवळ कारवाई पुरेशी नाही, तर संपूर्ण शुद्धीकरणाची गरज आहे.
या प्रकारामुळे प्रशासनातील प्रामाणिकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असून, लोकसेवेत फसव्या मार्गांनी शिरकाव करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी होत आहे.
हे ही वाचा : Political Economy: बोनस : राजकीय अर्थव्यवस्था समजून घ्या, अर्थसाक्षर व्हा– संजीव चांदोरकर
About The Author
Discover more from Rayat Samachar
Subscribe to get the latest posts sent to your email.